मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला लग्नाआधीच आई बनणार आहे. ब्रुना ब्राझिलियन मॉडेल असून ती अनेक हिंदी चित्रपटांमध्येही झळकली आहे. गेल्यावर्षी तिने ब्रिटीश बॉयफ्रेन्ड एलिन फ्रेजरसोबत साखरपुडा केला आहे.
एका मुलाखतीत ब्रुनाने बरोबर मदर्स डेच्या एक दिवस आधी आपण गरोदर असल्याची गोड बातमी सर्वांना दिली. ब्रुनाचा पाचवा महिना सुरु असून ती या गोड बातमीमुळे अत्यंत आनंदी आहे. लग्न म्हणजे प्रेमाचं केवळ एक प्रमाणपत्र आहे. लग्नामुळे दोन व्यक्तींना एकत्र राहणे बंधनकारक असतं. मात्र लग्न न करता देखील अनेक जोडपी खुश असतात आणि एकत्र राहतात, असं ब्रुनाने म्हटलं.
ब्रुना अब्दुल्लाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिचे बेबी बम्प आपल्याला दिसून येत आहे. माझं बाळ हेल्दी असल्याची माहिती ब्रुनाने दिली. या गोड बातमीमुळे आमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. माझी आई सर्वात जास्त खुश आहे. एलिन आणि मी आमच्या पहिला बाळाची आतुरतेने वाट पाहत आहोत, असं ब्रुनाने म्हटलं.
मी गरोदर असल्याचं ज्यावेळी मला कळालं, त्यावेळी माझ्याकडे अनेक प्रोजेक्ट्स होते. सर्वप्रथम मी माझी सर्व कामे पूर्ण केली आणि त्यानंतर गरोदर असल्याचं जाहीर केलं. कामासाठी दिलेला शब्द पाळला जावा हा यामागे माझा उद्देश होता. मात्र बाळाच्या जन्मानंतर मी जास्तीत जास्त वेळ बाळासोबत घालवणार असल्याचंही ब्रुनाने सांगितलं.
ब्रुनाची बॉलिवूडमधील कारकिर्द
ब्रुनाने अक्षय कुमार, जॉन अब्राहम यांसारख्या सुपरस्टार्ससोबत रुपेरी पडता शेअर केला आहे. आय हेट लव्ह स्टोरी, ग्रॅन्ड मस्ती, देसी बॉईज, मस्तीजादे आणि कॅश या सिनेमांमधून ब्रुना रुपेरी पडद्यावर झळकली आहे. याशिवाय अनेक रिअॅलिटी शोजमधूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती. यामध्ये खतरों के खिलाडी, नच बलिए सीजन-6 आणि कॉमेडी क्लासेस या शोजचा समावेश आहे.