Ram Gopal Varma On Oppenheimer : 'ओपनहाइमर' (Oppenheimer) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. भारतीय सिनेप्रेक्षकांचा या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमातील एका दृश्यावरुन सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाळ वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या 'ओपनहाइमर' या सिनेमासंदर्भातील एका ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राम गोपाळ वर्मा यांनी नुकताच ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित 'ओपनहाइमर' हा सिनेमा पाहिला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं आहे,"ओपनहाइमर'चा सिनेमा म्हणून विचार करणं चूक आहे. हा सिनेमा नसून मानव आहे. ओपनहाइमर यांनी अणुबॉम्बची निर्मिती केली. पण या सिनेमाने सिनेमॅटिक बॉम्ब तयार केला आहे".
राम गोपाळ वर्मा यांनी पुढे लिहिलं आहे,"ख्रिस्तोफर नोलन हा एकमेव दिग्दर्शक आहे जो प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा विचार करतो. आम्ही सर्व सिने-निर्माते त्यांच्या या गोष्टीचा आदर करतो. तुम्ही 'ओपनहाइमर' पाहिला नाही म्हणजे आयुष्यात तुम्ही कोणताच सिनेमा पाहिलेला नाही".
'ओपनहाइमर'चा भारतात बोलबाला (Oppenheimer Box Office Collection)
'ओपनहाइमर' या सिनेमाची जगभरात चांगलीच क्रेझ आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या तीन दिवसांत भारतात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 14.5 कोटी. दुसऱ्या दिवशी 17.25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 17.25 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 49 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
संबंधित बातम्या