ऑक्टोबर या शूजित सरकार यांच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर आलं, त्यावेळीच लक्षात येतं की हा सिनेमा काहीतरी वेगळा असणार आहे. कारण सर्वसाधारणपणे महिन्याचं नाव सिनेमाला दिलं जात नाही. बरं, त्यातही शुजितदांनी ऑक्टोबर हे नाव देताना त्यातल्या ओ च्या ठिकाणी पारिजात अर्थात प्राजक्ताचं फूल वापरलं.
म्हणजे पोस्टरमध्ये इकडे वरूण धवन तिकडे बनिता संधू आणि मध्ये प्राजक्त.
त्यातून काय सांगायचं आहे का दिग्दर्शकाला? काय सांगायचं असेल? ऑक्टोबर या सिनेमाच्या टायटलमध्ये ओच्या ठिकाणी झेंडू, जास्वंद, मोगरा, गुलाब, अबोली, सदाफुली असं काहीही वापरता आलं असतं. मग त्यांनी प्राजक्त का वापरला?
शूजित सरकार यांचा ऑक्टोबर पाहून आल्यानंतर मनात रुतला होता तो प्राजक्त. कसं असतं ते फूल?
प्राजक्त दिसायला टवटवीत. पांढरा आणि गडद केशरी रंगाचा. या सौंदर्याला अल्पायुषाचा शाप मिळालेला. तशातही आपलं मरण हे फुल जगाला दाखवत बसत नाही. सगळं जग निजल्यावर हळूवार गळून पडण्यात त्याचा मोक्ष ठरलेला. बरं, झाडावर असतानाही प्राजक्ताचा गंध तुम्हाला भस्सकन येत नाही. तुम्हाला तो थांबून.. डोळे मिटून.. ऊर भरून घ्यावा लागतो. त्या गंधाच्या वेगाशी तुम्हाला आधी एकरूप व्हावं लागतं. तिथे ट्यून झालात तरच हा प्राजक्त तुमच्यात भरून उरतो. मग तो तुमचा असतो की तुम्ही त्याचे झालेले असता, याला उत्तर नाही.
प्राजक्ताच्या गंधाला दाद मिळते तीही अशीच मनातल्या मनातली. ज्याची त्याची आपआपली.
शूजित सरकार यांचा ऑक्टोबर असाच आहे. हा सिनेमा पाहताना यातली शिवली प्राजक्ताचं जणू फूल बनली आहे. आणि यातल्या एकमेव डॅनला या प्राजक्ताचा गंध कळला आहे.
हा सिनेमा बघताना आपल्याला या सिनेमाच्या वेगाशी जुळवून घ्यावं लागतं आणि मग हलके हलके त्याचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचतं. सिनेमाचा बाज असा आहेच. पण यात जी डॅन आणि शिवली यांच्या नात्याची गोष्ट आहे, तीही अशीच डॅन एका पंचतारांकित हॉटेलात इंटर्न म्हणून काम करतो. त्याच्यासोबत त्याच्या वर्गातले इतर मित्रही आहेत. त्यातलीच एक शिवली.
ज्युनिअर असूनही डॅनच्या बॅचमध्ये तिची वर्णी लागली आहे. त्यामुळे डॅनला तिच्याबद्दल उगाच आकस आहे. त्याच्या छोट्या छोट्या कृतीतून ते दिसतं. पण शिवलीची डॅनबद्दल तशी भावना नाही. उलट सर्वांकडून सतत बोलणी खाणाऱ्या डॅनबद्दल तिला जरा उगाच सॉफ्ट कॉर्नर आहे. पण तिने तो कधीच बोलून दाखवलेला नाही.
दिवसामागून दिवस जात असतानाच ३१ डिसेंबर येतो. सगळी मंडळी हॉटेलच्या गच्चीवर पार्टी करायला जातात. डॅन तिथे नाही. शिवलीही तिथे पोचते. डॅन कुठाय असा प्रश्न सहज विचारते आणि कट्ट्यावरुन तिचा तोल जातो. शिवली कोमात जाते. डॅनला नंतर हा प्रकार कळतो. तिने डॅनबद्दल विचारलेला शेवटचा प्रश्नही त्याला समजतो, मग मात्र त्याला उत्तर देण्यासाठी डॅन तिच्या हॉस्पिटलमध्ये जातो. तिथून या दोघांमधल्या अव्यक्त संवादाला सुरूवात होते.
शूजित सरकार सतत सिनेमा या माध्यमाच्या नव्या शक्यतांचा शोध घेताना दिसतात. मद्रास कॅफे, पिकू, विकी डोनर आणि आता ऑक्टोबर.. प्रत्येक सिनेमा वेगळा. विषय वेगळा.. त्याची मांडणी वेगळी. यावेळी त्यांनी या मांडणीत कवितेची गेयता शोधली आहे. म्हणून हा सिनेमा एक काव्य बनतं. या दोघांचा नातेसंबंध सांगतानाही अनेक महत्वाच्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला आहे.
आजच्या जगण्यात आलेली व्यावसायिकता, नातेसंबंधात वारंवार पाहिली जाणारी सोय, जपला जाणारा स्वार्थ आदी अनेक अदृश्य अंगांना हा दिग्दर्शक स्पर्श करतो. या सिनेमातला डॅन मनस्वी आहे. आपल्या मनाला काय वाटतं याच्याशी तो प्रामाणिक आहे.
व्यवहाराची,व्यवसायाची गणितं त्याच्या डोक्यात नाहीत असा भाग नाही. पण त्याला काय वाटतं, त्याकडे तो लक्ष देतो. म्हणूनच भवताली वेढून असलेल्या संधीसाधू मैत्रीला प्रश्न विचारतो.
हे सगळं घडत असताना, या सिनेमाच्या वेगाशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. समोर जे चालू आहे, त्यातून दिसणारा आणि निघणारा असे दोन अर्थ सतत पडताळून पाहावे लागतात. ही या सिनेमाची गंमत आहे. हे सांगताना फक्त, या सिनेमाचा वेग आणि त्यात घडणाऱ्या गोष्टी आणखी हव्या होत्या असं वाटत राहतं. या सिनेमाचा वेग थोडा वाढवता आला असता तर ही कविता किंचित प्रवाही झाली असती.
सिनेमाच्या तांत्रिक अंगांबाबत शंका घेण्याचं कारण नाही. शंतनू मोईत्रा यांचं संगीत हे त्यातलं आणखी एक कॅरेक्टर. यात आवर्जून कौतुक करायला हवं ते वरूण धवन आणि बनिता संधू, गीतांजली राव यांचा अभिनय केवळ लाजवाब. स्टुडंट ऑफ द इयर, बद्रिनाथ की दुल्हनियासारखे सिनेमे करताना ऑक्टोबरसारखा चित्रपट करून त्याने आपली रेंज पुन्हा दाखवून दिली आहे. म्हणूनच या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळतो लाईक. हा सिनेमा चांगला आहे.
थोडा धीर.. थोडी शांतता.. मनी आणणं शक्य असेल तर या प्राजक्ताचा गंध ऊर भरून घ्यायला हवा. आपल्या आजूबाजूला जागोजागी असे अनेक प्राजक्त असतात. फक्त आपल्याला ते नीट पाहता यायला हवेत.. प्राजक्तासारखी माणसं भले आपल्याला दिसत जरी नसली, तरी त्यांचं अस्तित्व आपल्याला कळायला हवं.. ही शांतता गरजेची असते ती त्यासाठी.
ऑक्टोबर : अव्यक्त प्रेमाचा गंध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2018 05:37 PM (IST)
शूजित सरकार सतत सिनेमा या माध्यमाच्या नव्या शक्यतांचा शोध घेताना दिसतात. मद्रास कॅफे, पिकू, विकी डोनर आणि आता ऑक्टोबर.. प्रत्येक सिनेमा वेगळा. विषय वेगळा.. त्याची मांडणी वेगळी. यावेळी त्यांनी या मांडणीत कवितेची गेयता शोधली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -