मुंबई : अजय देवगन, इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या 'बादशाहो' चित्रपटाला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. 'दीवार'मधलं गाणं वापरायचं असेल, तर 'बादशाहो' रीलिज करता येणार नाही, असं अल्टिमेटम मुंबई हायकोर्टाने चित्रपट निर्मात्यांना दिलं आहे. वर्टेक्स मोशन पिक्चर्स आणि टी सीरिजने सिनेमाची निर्मिती केली आहे.
1975 साली प्रदर्शित झालेल्या 'दीवार' चित्रपटातील 'कह दू तुम्हे' गाणं 'बादशाहो'त वापरल्यामुळे दीवारच्या निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली होती. 'कह दू तुम्हे' गाणं वापरल्यास 'बादशाहो' चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याचे आदेश गेल्या आठवड्यात खंडपीठाने दिले होते. त्याविरोधात बादशाहोच्या निर्मात्यांनी केलेली याचिकाही हायकोर्टाने फेटाळून लावली.
'कह दू तुम्हे, या चूप रहू, दिल में मेरे आज क्या है' या गाण्याच्या संगीत आणि गीताच्या कॉपीराईट्सवरुन दीवारच्या निर्मात्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं साहिर लुधियानवी यांनी लिहिलं होतं. आरडी बर्मन यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. अमिताभ बच्चन, शशी कपूर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
'बादशाहो' चित्रपटाच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा 'दीवार'चे निर्माते त्रिमूर्ती फिल्म्स यांनी 22 ऑगस्ट रोजी केला होता. 'कह दू तुम्हे' गाणं वापरल्यास 'बादशाहो' चित्रपटाचं प्रदर्शन थांबवा, मात्र ते गाणं वगळल्यास रिलीजला कोणतीही आडकाठी नसल्याचं जस्टिस के आर श्रीराम यांनी स्पष्ट केलं होतं.
अजय देवगन, इम्रान हाश्मी, इशा गुप्ता, एलियाना डिक्रुझ, विद्युत जमवाल, संजय मिश्रा यांच्या बादशाहोमध्ये मुख्य भूमिका आहेत. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, कच्चे धागे सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या खाद्यावर 'बादशाहो'ची जबाबदारी आहे. 1 सप्टेंबर 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
कॉपीराईट प्रकरणी हायकोर्टाचा 'बादशाहो'ला दिलासा नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2017 12:25 PM (IST)
'कह दू तुम्हे, या चूप रहू, दिल में मेरे आज क्या है' या गाण्याच्या संगीत आणि गीताच्या कॉपीराईट्सवरुन दीवारच्या निर्मात्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -