मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा महत्त्वकांक्षी 'पद्मावती' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा आता पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंह, दीपिका पादूकोण आणि शाहिद कपूर स्टारर हा चित्रपट यंदा 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता.

'पद्मावती'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचं कारण म्हणजे स्पेशल इफेक्ट्स आणि कलाकारांच्या अनेक सीनचं चित्रीकरण झालेलं नाही. भन्साली प्रॉडक्शन हाऊसने सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. पण काही वृत्तानुसार सिनेमा यंदा प्रदर्शत होणार नाही.


पुढील वर्षी एप्रिल महिन्यातील कोणत्याही तारखेला चित्रपट प्रदर्शन होईल. एप्रिलमध्ये शाळा तसंच काही कॉलेजांना सुट्टी असल्याने सिनेमाला फायदा होईल, असं म्हटलं जात आहे.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?

सिनेमाचं बजेट 150 कोटी रुपयांचं असल्याने निर्माते प्रत्येक बाजूने रिकव्हरीबाबत विचार करत आहेत. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्येही जास्त वेळ लागणार आहे. युद्धाचे अनेक दृश्य आहेत, ज्यात व्हीएफएक्सचा वापर होणार आहे.

महाराणी पद्मावतीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. दीपिका पादूकोण पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजी आणि शाहिद कपूर राजा रतन सिंहच्या भूमिकेत दिसली. सिनेमात अदिती राव हैदरीही दिसेल.

भन्साली यांचा हा चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा सामना करत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता. आता हा चित्रपट आठ महिन्यांनी प्रदर्शित होणार आहे.