मुंबई : प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज व्होरा गेल्या दहा महिन्यांपासून कोमामध्ये आहेत. बॉलिवूडमधला या प्रसिद्ध चेहऱ्याच्या प्रकृतीबाबत सध्या मात्र कोणाकडे फारशी माहिती नाही. त्यांचा आगामी चित्रपट 'हेराफेरी 3' होल्डवर ठेवण्यात आला आहे.
नीरज व्होरा यांना हृदयविकाराच्या धक्क्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून ते कोमात
गेल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 19 ऑक्टोबरला त्यांना हार्ट अटॅक आला होता. 'एम्स'मध्ये दाखल केल्यानंतर
'दीर्घकाळापासून कोमात असलेला रुग्ण' अशी त्यांची नोंद करण्यात आली.
निर्माते फिरोझ नादियाडवाला यांच्या जुहूमधील बरकत व्हिलामध्ये व्होरा यांना हलवण्यात आलं. 11 मार्चपासून
नादियाडवालांच्या घरातील एका रुमचं रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे रुममधल्या भिंतींवर व्होरांच्या सिनेमांची पोस्टर्स आणि डीव्हीडीज लावण्यात आल्या आहेत.
कंपनी, पुकार, रंगीला, सत्या, बादशाह, मन यासारख्या 90 च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये नीरज व्होरा झळकले होते. अकेले हम अकेले तुम, रंगीला, चोरी चोरी चुपके चुपके, जोश, बादशाह, हेरा फेरी, आवारा पागल दिवाना यासारखे अनेक चित्रपट त्यांच्या लेखणीतून उतरले. तर फिर हेरा फेरी, खिलाडी 420 सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं.
व्होरा यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी 24 तास नर्स, वॉर्डबॉय असतात. फिजिओथेरपिस्ट, न्युरोसर्जन, अॅक्युपंक्चर थेरपिस्ट आणि जनरल फिजीशियन दर आठवड्याला भेट देतात. व्होरा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे लवकरच ते बरे होतील, अशी आशा त्यांच्या मित्रांना वाटते.
नीरज व्होरा यांच्या पत्नीचं काही काळापूर्वी निधन झालं. व्होरा यांना अपत्य नाही.