National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला (National Film Awards 2023) सुरुवात झाली आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडत आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या (Droupadi Murmu) हस्ते  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आलियानं एन्ट्री केली. त्यानंतर तिनं आनंद व्यक्त केला आहे.


काय म्हणाली आलिया?


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दूरदर्शन नॅशनल चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलिया म्हणाली, "मला जे वाटतंय ते मी शब्दात मांडू शकत नाही. मला खूप आनंद होत आहे. खूप वेगळी भूमिका मला साकारण्याची संधी मिळाली. मी आता संजय लिला भन्साळी यांना खूप मिस करत आहे. त्यांनी हा चित्रपट दिला, त्यासाठी मी त्यांचे जेवढे आभार मानेल तेवढे कमी आहेत. हा माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यामुळे खूप आनंद होत आहे."


व्हाईट साडी आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक आलियानं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी केला. आलियानं परिधान केलेल्या साडीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  






संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा मुंबईतील कामाठीपुरा येथील वैश्याव्यवसायाशी निगडित असलेल्या 'गंगूबाई काठियावाडी' यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात शंतनू माहेश्वरी आणि विजय राज यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.


आलिया ही लवकरच जिगरा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आलियाच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Alia Bhatt : सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने आलिया भट्टचा आनंद गगनात मावेना; पोस्ट शेअर करत म्हणाली...