Nana Patekar Slap Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहत्याच्या कानाखाली वाजवतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पण नंतर हा शूटिंगचाच भाग असल्याचं सांगत नानांनी त्यांची बाजू मांडली. आता या प्रकरणी चाहत्यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. नानांनी मारलेली थप्पड ही शूटिंगला भाग नसल्याचं चाहत्याने सांगितलं आहे. तसेच नानांवर कारवाई करणार नसल्याचंही तो म्हणाला.


नानांनी कानाखाली वाजवलेला व्यक्ती माध्यमांसोबत बोलताना म्हणाला की,"बनारसमधील तुलसीपुरात मी लहानाचा मोठा झालो आहे. नाना पाटेकरांचा मी मोठा चाहता असून त्यांनी आता माझ्या कानाखाली वाजवली आहे. मी गंगा घाटावर गेलो होतो तेव्हा तिथे सुरू असलेलं शूटिंग पाहायला मी गेलो. त्यावेळी मी नाना पाटेकरांना पाहिलं आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो. दरम्यान त्यांनी सेल्फी न देता माझ्या कानाखाली वाजवली". 






नानांचा चाहता पुढे म्हणाला,"जर्नी' सिनेमात मला कोणतीही भूमिका मिळालेली नाही. नानांनी माझ्या कानाखाली वाजवल्यानंतर सेटवर माझा अनादर करण्यात आला. कानाखाली वाजवल्यानंतर मला पळवून लावण्यात आलं. सुरुवातीला शूटिंग लांबून पाहत असताना ते नानाच आहेत याची मला खात्री नव्हती. पण मी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी गेलो तेव्हा मला वाईट अनुभव आला. नानांच्या या वागण्याने मी खूप निराश झालो आहे. पण मला या प्रकरणाची कोणतीही कारवाई करायची नाही". 


नाना पाटेकरांची बाजू काय? (Nana Patekar On Viral Slap Video)


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पाटेकरांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले,"व्हिडीओमधील प्रसंग हा माझ्या आगामी 'जर्नी' या सिनेमाचा भाग आहे. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. मी असं कधीही वागत नाही. मी कधी कोणावर हात उचलत नाही. उलट लोकांवर खूप प्रेम करतो. बनारसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही मला लोकांचं प्रेम मिळत आहे". 






संबंधित बातम्या


Nana Patekar : नाना पाटेकरांनी चाहत्याची कानशीलं सुजवली? व्हायरल व्हिडीओवर VIDEO शेअर करत दिलं स्पष्टीकरण