Munjya Box Office Collection Day 25 : आदित्य सरपोतदार (Adiytya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांची मुख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने (Munjya) झोकात 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. कमी बजेटमध्ये निर्मिती, कोणताही मोठा चेहरा नसताना मुंज्याने चौथ्या आठवड्यातच 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.
बॉक्स ऑफिसवर कल्की 2898 एडी चित्रपटाची लाट आलेली असतानादेखील मुंज्याने एका बाजूने आपली कमाई सुरू ठेवली आहे. 'कल्की 2898 एडी'मुळे मुंज्याच्या कोटींच्या कमाईला ब्रेक लागल्याचे चित्र होते. मुंज्याने 20 व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर 90 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता 'मुंज्या'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली.
'मुंज्या'ने पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात ‘मुंज्या’ने 32.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता चित्रपटाच्या रिलीजला चौथा आठवडा पूर्ण करण्याआधी मुंज्याने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ने 118.51 कोटींची कमाई केली आहे.
यंदाच्या वर्षात ज्या मोठ्या चित्रपटांना जमले नाही ते 'मुंज्या'ने करून दाखवले आहे. या चित्रपटात कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही. त्याशिवाय, चित्रपटाचे मोठे बजेट नाही. मात्र, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगले कथानक यामुळे 'मुंज्या'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'मुंज्या'च्या आधी बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टारचे चित्रपट आले होते. पण,त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.
‘मुंज्या’ ने दिली मोठ्या चित्रपटांना मात...
फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मुंज्या’ ने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. या चित्रपटाने 350 कोटींचे बजेट असलेली ‘बड़े मियां छोटे मिया’ आणि 200 कोटींचा बजेट असलेल्या अजय देवगणची भूमिका असलेल्या मैदान चित्रपटाला मात दिली आहे. ‘बड़े मियां छोटे मिया’ ने बॉक्स ऑफिसवर 65 कोटींची कमाई केली. तर, 'मैदान'ने 52 कोटींची कमाई केली होती.