Munawwar Rana Passed Away : आपल्या आवाजाने चाहत्यांना भुरळ घालणारे शब्दांचे जादूगार, लोकप्रिय उर्दू कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी लखनौच्या पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 


मुनव्वर राणा यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. लखनौ येथील पीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुनव्वर यांना किडनीचाही आजार होता. किडनीचा त्रास होत असल्याने त्यांना याआधीदेखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


मुनव्वर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार


मुनव्वर यांची मुलगी सुमैयाने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वर यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (15 जानेवारी 2024) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुनव्वर यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. मुनव्वर यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1952 रोजी उत्तर प्रदेशातील रायबरेली याठिकाणी झाला होता. 






मुनव्वर राणा कोण होते? (Who is Munawwar Rana)


मुनव्वर राणा हे लोकप्रिय उर्दू कवी आणि लेखक होते. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या मुनव्वर यांना 2014 मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'शाहदाबा' या कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. वेगळ्या लेखनशैलीमुळे त्यांच्या गझलाही लोकप्रिय झाल्या आहेत. 


मुनव्वर यांना उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कराने सन्मानित आले होते. पण त्यानंतर वर्षभरात त्यांनी हा पुरस्कार परत केला. देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे राज्य प्रायोजित सांप्रदायिकतेमुळे पुन्हा कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, असे त्यांनी वचन दिले. 2012 मध्ये त्यांना उर्दू साहित्यातील सेवेबद्दल शहीद शोध संस्थेने माती रतन सन्मानाने सन्मानित केले.


राजकारणात सक्रिय होते मुनव्वर राणा


साहित्यासह मुनव्वर राणा हे राजकारणातही सक्रिय होते. त्यांची मुलगी सुमैया ही समाजवादी पक्षात सक्रिय आहे. राणा नेहमीच कोणत्या ना कोणत्या राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांची काही गोष्टींवरील मतं नेहमीच वादग्रस्त ठरतात. पॅरिस येथील शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्या हत्याकांडाला दिलेल्या पाठिंब्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तसेच तालिबानला केलेल्या समर्थनामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.


संबंधित बातम्या


Munawwar Rana Health: प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांची प्रकृती गंभीर, लखनौमधील रुग्णालयात उपचार सुरु