Mulayam Singh Yadav: ‘मैं मुलायम सिंह यादव'; चित्रपटातून उलगडले मुलायम सिंह यादव यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू
‘मैं मुलायम सिंह यादव’ या चित्रपटात मुलायम सिंह यादव यांच्या जीवनात अलेले विविध प्रसंग दाखवण्यात आले आहेत.
Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं राजकिय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुलायम सिंह यादव यांच्यावर जीवनावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये मुलायम सिंह यादव यांच्या जीवनात अलेले विविध प्रसंग दाखवण्यात आले आहेत. ‘मैं मुलायम सिंह यादव’ असं या चित्रपटाचं नाव आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल...
चित्रपटात या कलाकारांनी साकारल्या भूमिका
‘मैं मुलायम सिंह यादव’या चित्रपटाचं दिग्दर्शन सुवेंदु घोष यांनी केलं आहे. या चित्रपटात मुलायमसिंह यादव यांची भूमिका अमित सेठी यांनी साकारली आहे तर अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहने मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल सिंह यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात प्रेरणा सिंह, जरीना वहाब आणि अनुपम श्याम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अशी झाली राजकारणात एन्ट्री
चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, मुलायम सिंह यादव यांनी कुस्तीपटू व्हावं अशी मुलायम सिंह यांच्या वडिलांची इच्छा होती. एका कुस्ती स्पर्धेदरम्यान त्यांची भेट स्थानिक नेते नथुराम यांच्याशी झाली आणि त्यातूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. पाहता पाहता ते राजकारणातील यशस्वी नेते झाले.
नथुराम, राम मनोहर लोहिया आणि चौधरी चरणसिंग यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर मुलायम सिंह यांचे राजकीय क्षेत्रातील ज्ञान कसे वाढले हेही चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मुलायम सिंह यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी मेदांता रुग्णालयात निधन झालं. मुलायम यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुलायम सिंहांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं असून 1977 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. टावा जिल्ह्यातील सैफई येथे 22 नोव्हेंबर 1939 रोजी जन्मलेल्या मुलायम सिंह यादव यांनी राज्यशास्त्रात एमएपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: