Mukta Barve Y Marathi Movie : गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर भाष्य करणारे, विविध धाटणीचे सिनेमे (Marathi Movies) प्रदर्शित होत आहेत. सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांचं प्रबोधनदेखील करत आहेत. सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या मुक्ता बर्वेच्या (Mukta Barve) 'Y'चा आज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. अशातच आता या सिनेमातील लेक वाचवायची हाक देणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
 
‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा,  त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नका, त्यांना शिक्षण द्या, सक्षम बनवा’ याची जनजागृती करण्यासाठी देशभर मोहीम राबवली जात आहे. हाच विचार पडद्यावर मांडणाऱ्या ‘वाय’ (Y) या सिनेमाने प्रेक्षकांना अंतर्मुख केलं होतं. याच निमित्ताने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं  आहे. या गाण्यात 'मुलीला जन्म द्या' हा सुंदर संदेश अगदी प्रभावीपणे देण्यात आला आहे. 


‘वाय’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर कधी होणार?


‘वाय’ हा सिनेमा स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर भाष्य करणारा आहे. सिनेप्रेक्षकांना 'Y' हा सिनेमा रविवारी 24 डिसेंबरला दुपारी 12 आणि सायंकाळी 6 वाजता पाहता येणार आहे. या सिनेमाच्या खास प्रमोशनसाठी हे नवं गाणं तयार करण्यात आलं आहे.
 
'मुलगी झाली हो' असं सांगताना अनेक पालकांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर दुःख असते. पहिली मुलगी असेल तर दुसऱ्यावेळी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केलं जातं आणि मुलीचा गर्भ असल्याचं कळलं की गर्भातच तिचा जीव घेतला जातो. जर दुसरी मुलगी जन्माला आली तर तो तान्हा जीव अनाथाश्रमाच्या पायरीशी ठेवला जातो किंवा रेल्वे रुळावर टाकला जातो. 






समाजात ही मानसिकता इतकी खोलवर रुजली आहे की ‘मुलगी वाचवा’ असा जागरच देशभर करावा लागत आहे .स्त्रीभ्रूण हत्या हा आजच्या काळात गंभीर प्रश्न बनला आहे. अनेक महिला यामध्ये भरडल्या जात आहेत. त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण होत आहे .काही डॉक्टर गर्भलिंग निदान करून या प्रश्नात अधिकच भर घालत आहेत. याचे सामाजिक फटकेही बसत आहेत. मुलांच्या जन्मदरामागे मुलींचा जन्मदर कमी होत आहे; परिणामी मुलींचे समाजातील प्रमाण घटत चालले आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी तसेच अभिनेता नंदू माधव, संदीप पाठक यांच्या सशक्त अभिनयाने साकारलेल्या ‘वाय’ या सिनेमात स्त्रीभ्रूण हत्या, गर्भलिंग निदान करणारी वैद्यकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि सांकेतिक भाषा यावर सणसणीत भाष्य करण्यात आले आहे. 
 
‘मुलगी वाचवा’ हे खास गाणं मुलगी म्हणजे काय असते, हे सांगणारं गाणं आहे. डोळ्यात पाणी आणणारे आणि सध्याच्या परिस्थितीचा आलेख मांडणारे हे गाणे प्रेक्षकांच्या काळजाला नक्कीच भिडेल. “तुझा माझा, माझा तुझा श्वास ग एक .. गोजिरी किती माय साजिरी लेक” असे या गाण्याचे बोल आहेत. सायली खरे यांच्या संगीतातून आणि आवाजातून हे गाणं साकारले आहे.


संबंधित बातम्या


Y Marathi Movie : 'वाय'च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव; स्त्री भ्रूण हत्येवर भाष्य करणारा सिनेमा