Y Marathi Movie : काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' (Y) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात. ज्यांचा आपल्याला थांगपत्ताही नसतो आणि अगदीच या घटनांबाबत कळले तर त्याकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. त्याचेच मिश्र स्वरूपातील पडसाद मग आपल्या समाजात उमटतात. अजित वाडीकर दिग्दर्शित 'वाय' या सिनेमात अशाच गोष्टीवर भाष्य करण्यात आले आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा
काही दिवसांपूर्वीच 'वाय' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून 'वाय'ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक असा संवेदनशील विषय आहे, ज्याचे गांभीर्य चुकीच्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येऊ नये, याची काळजी 'वाय'मध्ये कटाक्षाने घेण्यात आली आहे. त्यामुळेच 'वाय'वर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून या चित्रपटाबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी शेअर केल्या आहेत आणि या निमित्ताने एक भयाण वास्तव आपल्या समोर आले आहे.
'वाय' या सिनेमाच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या हा समाजातील एक अतिशय घृणास्पद प्रकार प्रेक्षकांसमोर आला आहे. राज्यातील अनेक भागात हा प्रकार आजही सर्रास चालतो आणि यात कोणालाच काही गैर वाटत नाही. 'वाय'च्या निमित्ताने वैद्यकीय विभागात चालणारी ही लाजिरवाणी गोष्ट पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. अनेकदा स्त्रियांना हा निर्णय दबावाखाली घ्यावा लागतो. याची साधी वाच्यताही कुठे करता येत नाही. मात्र 'वाय' पाहिल्यानंतर अनेक महिला प्रेक्षक या विषयावर उघडपणे भाष्य करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. स्वतःहून पुढे येऊन अनेक महिलांनी आपले हृदयस्पर्शी अनुभव ‘वाय’च्या टीमसोबत शेअर केले. काही प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया संदेशाद्वारे, फोनद्वारे, सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. सिनेमा पाहताना आपलीच व्यथा पडद्यावर मांडण्यात आल्याचा भास झाल्याचेही अनेकांनी सांगितले. अनेकांनी हे प्रकार आपल्या आजूबाजूला घडल्याचेही सांगितले. तर यातील अनेक जणी 'या' घटनेतून गेल्या होत्या.
समाजातील सत्य परिस्थिती 'वाय' या सिनेमात हुबेहूब दाखवण्यात आली आहे. मेंदू सुन्न करणाऱ्या या प्रतिक्रिया असून कित्येक अनुभव हे निःशब्द करणारे आहेत. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या अर्थहीन परंपरेला 'वाय'च्या निमित्ताने कुठेतरी पूर्णविराम लागेल, अशाही प्रतिक्रियाही काही महिलांनी दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी मुक्तासारखी ताकद, प्राजक्ता सारखी निर्णय घेण्याची धमक आमच्यात यावी, असेही म्हटले आहे. त्यामुळे या सिनेमातून देण्यात आलेला संदेश 'ती'ला प्रेरणा आणि 'या' संघर्षाशी लढा देण्याची ताकद देणारा आहे. जो संदेश या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तो योग्यरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, हे या प्रतिक्रियांवरून कळत आहे. मात्र त्यांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव मन सुन्न करणाऱ्या आहेत. आजच्या काळातही अशा घटना घडत आहेत, हे खरंच दुर्दैवी आहे. हा खरंच 'ती'चा तिच्याशीच लढा आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि यासाठी 'ती'नेच पुढाकार घेतला पाहिजे.''
संबंधित बातम्या