Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुपरहिट मालिका दिल्यानंतर मनोरंजन विश्वापासून दूर असलेली मृणाल आता अमेरिकेहून भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर मृणालने सगळ्यात आधी आईने बनवलेल्या जेवणावर ताव मारला. मृणाल अमेरिकेत गेल्यामुळे चाहत्यांना तिची खूप आठवण येत होती. अखेर नाशकातील गोदाकाठ परिसरातील फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्रीच्या आगामी मालिका (Serial), सिनेमे (Movies)आणि नाटकांची (Drama) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
नाशिक ते मुंबई असा प्रवास करत मृणालने मायानगरीत कष्टाने स्वत:ची ओळख बनवली आहे. गोड चेहरा, हास्य, आणि पडद्यावर ठामपणे स्वत:ची भूमिका मांडणं आणि ती व्यक्तीरेखा जगणं हे मृणालच्या अभिनयाचं खरं वैशिष्टय आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मृणालने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. मृणास दुसानिस आणि निरज मोरे यांना 24 मार्च 2024 रोजी कन्यारत्न झाले. मृणालच्या लेकीचं नाव 'नूर्वी' असं आहे.
मृणाल दुसानिस आता भारतातच राहणार!
चार वर्षांनी भारतात परतल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना मृणाल दुसानिस म्हणाली,"चार वर्षांनी मायदेशी परतल्यानंतर खूप छान वाटत आहे. आता मी एकटी नसून माझी लेकदेखील माझ्यासोबत आहे. त्यामुळे आयुष्य नक्कीच बदललं आहे. आता मात्र मी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे".
चार वर्षांनी लेकीसह नाशकात
मृणालने सोशल मीडियावर नाशकातील गोदाकाठ परिसरातील फोटो शेअर केले आहेत. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली,"माझी लेक नूर्वी खूप लहान आहे. पण तरीही माझ्या नाशिकला ती पहिल्यांदाच आली. पहिल्यांदा तिला संपूर्ण नाशिक फिरवताना खूप मजा आली. नूरीला पाण्याचं खूप आकर्षण आहे. त्यामुळे नदीकाठी आम्ही तिघांनी खूप छान वेळ घालवला".
मृणाल दुसानिस कमबॅकसाठी सज्ज!
मृणाल दुसानिस अमेरिकेत गेल्यानंतर चाहत्यांनी तिची तिच्या कलाकृतींची खूप आठवण येत होती. आता मृणाल भारतात आली असून पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली,"आता मला पुन्हा काम सुरू करायचं आहे. प्रेक्षकही मला आगामी प्रोजेक्टबद्दल विचारत आहेत. त्यामुळे चांगल्या संधीची वाट पाहत आहे. सिनेमात काम करण्याची माझी इच्छा आहे. तसेच नाटकात काम करायलाही मला आवडेल. प्रायोगिक नाटकात मी काम केलं आहे. आता व्यावसायिक नाटकात काम करण्याची माझी इच्छा आहे".
भारतात आल्यानंतर मृणालने सगळ्यात आधी काय केलं?
भारतात आल्यानंतर मृणाल सगळ्यात आधी स्वामींच्या मठात गेली. तसेच आईच्या हातच्या जेवणावर ताव मारला. भारतात आल्यानंतर मृणालला खूप बदल जाणावले आहेत. याबद्दल बोलताना ती म्हणाली,"नवे रस्ते बांधले आहेत. अनेक ठिकाणी मेट्रो सुरू झाल्या आहेत. तसेच माझं वैयक्तिक आयुष्यदेखील बदललं आहे. सध्या मी सगळं नव्याने अनुभवत आहे".
संबंधित बातम्या