मुलांच्या जडणघडणीमध्ये शाळा हा फॅक्टर महत्वाचा असतो. शालेय वयात मुलांच्या आवडीनिवडी वाढीला लागतात. त्यांना नेमक्या कोणत्या विषयात गती आहे हे त्यावेळी लक्षात येतं. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची खरंतर ही जबाबदारी आहे, की अशा मुलांमध्ये असलेले गुण ओळखून ते पारखणं आणि त्यांना आणखी चांगल्या पद्धतीने साकारणं. पण दुर्दैवाने आपल्याकडे बहुतांश भागात शिक्षण हा पाटी टाकण्याचा प्रकार असतो. त्यामुळे मुलांच्या अंगभूत गुणांकडे लक्ष दिलं जातंच असं नाही. म्हणून कुवत असूनही मुलांना हव्या त्या गोष्टीची गोडी लागत नाही. बऱ्याचदा आपल्याला काय आवडतं ते कळूनही शाळेतल्या शिक्षकांकडून अपेक्षित प्रोत्साहन न मिळाल्यामुळंही गोची होते. आपल्या भवताली असं होत असतंच. पण अत्यंत छोट्या गावात असं बऱ्याचदा घडतं. अर्थात आपण अशा वर्तनाने नेमकं काय घडवतोय आणि मुलांच्या नशिबी नेमकं काय येतंय याची कल्पना शिक्षकांनाही नसते आणि मुलांनाही. पण त्याचे दूरगामी परिणाम होत असतात. पळशीची पीटी हा अशाच व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट म्हणावा लागेल.
धोंडिबा कारंडे यांचा हा पहिला चित्रपट. यापूर्वी लागीरं झालं जीमधून धोंडिबा दिसले होते. साताऱ्यात राहणाऱ्या या दिग्दर्शकाने अत्यंत मेहनतीने आपल्या या पहिल्या चित्रपटावर संस्कार केले आहेत. गावातल्या गावात माणसं गोळा करून.. अत्यंत हिमतीने त्यांनी हा सिनेमा बनवलेला जाणवतो. त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं कौतुक. आता केवळ चित्रपट म्हणून त्याचा विचार करताना काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. या चित्रपटाची गोष्ट वेधक आहे. छोट्या दुर्गम खेड्यातली मुलगी शाळेत शिकायला येते. तिचं नाव भागी. धनगराच्या कुटुंबात जन्माला आल्यानं तिचं घर तसं गावाबाहेर. पण घरची काम करून शिक्षणाच्या ओढीनं ही मुलगी शाळेत येते. घरची कामं करता करता उशीर होत असल्यामुळे ती दररोज पळतच शाळेत येते. धावण्याची उपजत आवड असल्याचा प्रत्यय तिच्या पीटीच्या शिक्षकांनाही येतोय. पण तिच्याकडे तसं दुर्लक्ष केलं जातं आहे. मुळात माध्यमिक शाळांमध्ये पीटीबाबत उदासीनता आहेच. केवळ कागदावरच्या स्पर्धा.. घेतलेल्या परीक्षा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही उदासीनता या सिनेमातल्या शाळेतही आहे. त्यामुळे गरज म्हणून भागीला या शर्यतीत घातलं जातं. त्यानंतर भागीचं काय होतं त्याची ही गोष्ट
दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट असल्यामुळे विषय हाताळणीतला नवखेपणा अनेक प्रसंगात दिसतो. पण सांगण्यासारखं बरंच काही असल्यामुळे तो नवखेपणा चित्रपटाच्या आड येत नाही. एकीकडे भागीची कौटुंबिक स्थिती, शाळा, शाळेतल्या शिक्षकांचं निर्ढावलेपण दाखवतानाच त्याच शिक्षकांची दुसरी बाजूही यात दाखवली गेली आहे. भागीसारख्या अनेक मुलांना आपल्यात काय आहे याचा साक्षात्कार होतो तो याच शिक्षकांमुळे. चित्रपटात संगीताचं स्थान अत्यंत कमी आहे . पण जे आहे ते खूप सूचक आहे. या सिनेमात सिनेमॅटिक लिबर्टी कुठेही नाही. म्हणजे धावण्याची स्पर्धा असली की स्लो मोशन वापरण्याचा मोह अनेकांना होतो. पण इथे तो मोह टाळलेला दिसतो. कारण, या सिनेमातल्या स्पर्धेची.. धावण्याची.. आणि एकूणच परिस्थिती जी आहे तेवढीच दाखवणं आणि पाहणाऱ्याला जाणवून देणं दिग्दर्शकाला महत्वाचं वाटतं. अत्यंत कमीत कमी तांत्रिक गोष्टींचा आधार घेत हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यातली फ्रेम हे या सिनेमाचं एक कॅरेक्टर बनतं. सिनेमातली गोष्ट लक्षात येते पण ती आणखी इतर काही प्रसंगांनी भरायला जागा होती असं वाटून जातं. अपेक्षित परिणाम साधला जातोच. पण तो साधला जाताना त्या प्रसंगांच्या शृंखलेत आणखी काही प्रसंग असायला हवे होते असं वाटून जातं. ते असतं तर हा चित्रपट आणखी भरीव आणि कोरीव झाला असता असं वाटून जातं. पण अर्थातच मघाशी सांगितल्याप्रमाणे हा पहिला प्रयोग आहे. यातून खूप काही शिकून नवा सिनेमा बनवण्यासाठी दिग्दर्शक एव्हाना सज्जही झाला असेल.
चित्रपटात किरण ढाणे, राहुल बेलापूरकर, धोडिबा कारंडे, राहुल मगदूम, तेजपाल वाघ आदी अनेक कलाकार काम करतायत. या सर्वंच कलाकारांनी नेटकी कामं केली आहेत. आवर्जून उल्लेख करायला हवा तो छायांकनाचा. एकुणात सिनेमा खूप काही सांगतो.. बोलतो. फक्त प्रसंगांची पेरणी आणखी थोडी असती तर आणखी मजा आली असती असं वाटून जातं. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला आपण देतो आहोत तीन स्टार्स. तसा सिनेमा रॉ आहे. सतत मसालेदार पाहण्यापेक्षा असं थोडं सोबर.. कमी मसालेदार पण तितकंच पौष्टिक पाहायला हरकत नाही.