आर बाल्की हा माणूस काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न करतो. पा, चीनी कम असो किंवा आता आलेला पॅडमॅन असो. एकतर या माणसाला गोष्ट सांगण्याची नेमकी पद्धत कळली आहे. ती सांगतानाच तो या गोष्टीची अशी निवड करतो की गोष्टीपेक्षा आपल्याला त्या माणसाला अनुभवण्याची गरज जास्त भासू लागते. यातूनच गोष्टीपेक्षा त्यातल्या व्यक्तिरेखा मोठ्या होतात, चित्त वेधून घेतात. पॅडमॅन त्याला अपवाद नाही. तामिळनाडूमधले कार्यकर्ते अरूणाचलम यांच्यावर बेतलेला हा सिनेमा आहे. ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेल्या लघुकथांच्या पुस्तकात त्यांची गोष्ट आहे. त्यावरून हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

या  सिनेमाची गोष्ट २००१ च्या आसपास घडते. ती अशी, लक्ष्मीप्रसाद हा एक अत्यंत बेताच्या परिस्थितीत वाढलेला तरूण. तो इंजिनीअर नाहीय. छोटीमोठी वेल्डिंगची कामं करणं हे त्याचं काम. पण सतत नवं काहीतरी बनवण्याचा त्याला ध्यास. लक्ष्मीचं लग्न होतं. आपल्या बायकोवर त्याचं जीवापाड प्रेम. तिच्या दैनंदिन जगण्यात आलेल्या अडचणी लक्ष्मी हुशारीने सोडवत असतो. अशाचवेळी प्रत्येक बाईच्या आयुष्यात येणारे पाच दिवस त्याच्या वाट्याला येतात. सॅनिटरी पॅड्सबाबत असलेली अनास्था, महाग पॅडस यामुळे महिलांची त्यातही बायकोची होणारी कुचंबणा तो पाहतो आणि हे पॅडस बनवण्याचा निर्णय घेतो. आता हे मशीन त्याने बनवलं हे तर सगळं जग जाणतं. पण त्याने ते कसं केलं.. त्याला कोणत्या दिव्यातून जावं लागलं याचा प्रवास या चित्रपटातून त्याने मांडला आहे.

चित्रपटाची कथा चांगली आहेच.  सिनेमाच्या पूर्वार्धात हा तो चांगला वेग पकडतो. व्यक्तिरेखांची ओळखही चांगली होते. उत्तरार्धात मात्र सिनेमाची गोष्ट पुढे जाता जाता काही प्रसंग मात्र शब्दबंबाळ होऊ लागतात. काही वेळा सिनेमात एकच शाॅट पुन्हा पुन्हा येतो. काही प्रसंग खेचलेले वाटतात. त्यामुळे या सिनेमाचा वेग मंदावतो.

अक्षयकुमारच्या वाट्याला आणखी एक चांगला सिनेमा आला आहे. गेल्या काही वर्षांपासून तो सातत्याने वेगळे सिनेमे करतोय. त्यात बेबी, स्पेशल २६, रुस्तम, टाॅयलेट एक प्रेमकथा अशा सिनेमांचा उल्लेख करता येईल. या सिनेमातही त्याने अभिनय योग्य केलाय. पण सिनेमा पाहता पाहता लक्ष्मीकांतच्या भूमिकेत तो न जाता, अक्षयकुमारच वाटू लागतो. त्याला चांगली साथ दिलीय ती राधिका आपटे, सोनम कपूर, ज्योती सुभाष यांनी.

एकूणात एक चांगला चित्रपट देण्याचा हा प्रयत्न आहे. कधी उघड न बोलल्या जाणाऱ्या विषयाला या निमित्ताने वाचा फुटली आहे. बाजारात ५०-५५ रुपयांना मिळणारी गोष्ट जेव्हा २ रूपयांना उपलब्ध होते तेव्हा तो शोध खूप महत्वाचा मानला जातो. या नव्या शोधाइतकाच हा सिनेमा.. यातला विषय महत्वाचा आहे. हा सिनेमा एकदा तरी बघायला हवाच. या चित्रपटाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळतोय लाईक. थिएटरमध्ये जा आणि चित्रपट बघा.