विवेक बेळे हे नाव आपल्याला नवं नाही. कोपरखळी मारता मारता चार गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगणं.. कधीमधी कानपिचक्या देणं अशा वेगवेगळ्या पद्धतींनी हा लेखक आपल्याशी संवाद साधत असतो. बेळे यांनी लिहिलेल्या नाटकांना चांगला प्रतिसाद होता. विशेषत: माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या नाटकांना. बेळेंच्या माकडाच्या हाती शॅम्पेनवर दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनीच सिनेमा बनवला होता. त्याचं नाव बदाम राणी गुलाम चोर. अाता काही वर्ष गेल्यानंतर बेळे लिखित काटकोन त्रिकोण या नाटकावर सतीश यांनी नवा सिनेमा बनवला आहे. त्याचं नाव आपला मानूस. सुमित राघवन, इरावती हर्षे आणि नाना पाटेकर अशी मोजकेच पण खमके कलाकार असल्यामुळे सिनेमाची चर्चा चांगली आहे. सिनेमाचा ट्रेलरही चित्त वेधून घेतो. चांगले कलाकार, अनुभवी दिग्दर्शक आणि विवेक बेळे यांचं लेखन हा त्रिवेणी संगम या सिनेमात पाहायला मिळतो. म्हणून हा सिनेमा केवळ गूढ बनत नाही तर तो नात्यांवर भाष्य करतो. दोन जनरेशन्समधलं अंतर दाखवतानाच, प्रत्येकाच्या मानसिकतेचा उभा छेद दाखवतो.
वरवर साधी वाटणारी गोष्ट बेळेंच्या लिखाणामुळे रंजक आणि तितकीच गुंतागुंतीची होते. राहुल, भक्ती आणि आबा गोखले यांचं कुटुंब. सर्व घरात असतात तशा कौंटुंबिक कुरबुरी गोखले कुटुंबातही सुरू आहेत आणि अचानक एक दिवस एक घटना घडते. त्याचा तपास करण्याची जबाबदारी मारूती नागरगोजे यांच्यावर येते. प्राथमिक तपासानुसार पहिले दोन आरोपी असतात राहुल आणि भक्ती. मग त्या घटनेचा तपास मारूती नागरगोजे कसा करतात त्याची ही कहाणी आहे.
नाटकाचं सिनेमात रुपांतर करणं हे खरंतर जोखमीचं काम. दिग्दर्शकासाठी खरंतर तेच शिवधनुष्य ठरतं. पण सतीशने इथे मात्र पूर्ण सावधगिरी बाळगलेली दिसते. चित्रपट म्हणून तो जास्तीत जास्त उत्कंठावर्धक कसा ठरेल याची काळजी त्याने यात घेतली आहे. अर्थात याचं मूळ लिखाण नाटकासाठी झाल्यामुळे त्याच्या मर्यादा काही प्रमाणात जाणवतात. सिनेमात एकच घटना पुन्हा पुन्हा येते. तुलनेनं त्यावर होणाऱ्या चर्चेचीही पुन्हा उजळणी होते. फक्त ती होताना अंतिम निष्कर्षात प्रेक्षकाला योग्य धक्का बसेल याची काळजी घेण्यात आली आहे. कथा, पटकथा, संवाद या तीनही पातळ्यांवर हा सिनेमा नेटका आहे. पार्श्वसंगीत, संकलन, छायांकन या सर्व बाबती योग्य सांभाळल्या गेल्या आहेत. अर्थात नाना पाटेकर यांचा अभिनय हा या चित्रपटाचा हुकमी एक्का. नानांचा दरारा, दिमाख आणि आब याचा पुरेपूर वापर दिग्दर्शकाने करून घेतला आहे. बेफिकीर पण हुशार मारूती नागरगोजे पाहाण्यात गंमत आहे. तीच बाब सुमित राघवन आणि इरावती हर्षे यांची. सुरूवातीला अत्यंत व्हाइट काॅलर्ड वाटणारं हे जोडपं नंतर मारूतीच्या दाव्यानुरूप आपले वेगवेगळे रंग दाखवू लागतं, ते लाजवाब आहे.
पूर्वार्ध-उत्तरार्ध नेटके असले तरी सिनेमाच्या शेवटी येणारं एक सरप्राईज पॅकेज आहे. ते दिसायला छान असलं तरी त्याचं सिनेमात असणं अनाकलनीय आहे. त्याचवेळी सगळ्या पुराव्यांचा हिशेब शेवटी मांडताना एक पुरावा मिसिंग असल्याचं जाणवतं. खरंतर तो महत्वाचा पुरावा आहे. चित्रपट संपता संपता या गोष्टी राहून गेल्यासारख्या वाटतात.
एकूणात हा चित्रपट एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केवळ गूढ गोष्ट नसून नात्यांमधल्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून त्याचा उपाय सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायला हरकत नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळाला आहे. लाईक. गो अॅंड वाॅच धीस फिल्म.