राम गोपाल वर्माला झालंय तरी काय... असा प्रश्न यावेळीही तुम्हाला पडेल... कारण ज्यावेळी तो असे सिनेमे का करतो..? असं विचारलं जायचं त्यावेळी तो सरकारसारखे सिनेमेही करतो... असं उत्तर असायचं, पण आता त्याने सरकार 3 ज्या पद्धतीचा केला आहे, त्यावरून वाटलं की, सरकारची जी काही हललेली झेरॉक्स काढली आहे, त्यामुळे हे सारं आणखी रटाळ खेळ झालाय.
राम गोपाल वर्माने सरकारची फ्रेंचायझी ज्याप्रकारे टिकवली होती. आता त्यामधील इंटरेस्ट लेव्हल डाऊन करण्याला तो स्वतः जबाबदार आहे. मला अजूनही पहिल्या सरकारची प्रेस कॉन्फरन्स आठवते, त्यामध्ये रामूने फ्रान्सिस फोर्ड कपोलाला माझ्याकडून ट्रिब्यूट असं म्हणत... भारतीय मातीतला गॉडफादर केला होता. रेफरन्स पॉइण्टला बाळासाहेब होते. त्यामुळे या साऱ्या गोष्टीमुळे ते प्रकरण वठलं होतं, पण आता रामूने कथानकाचा ढाचा अन् पटकथेमधले ट्विस्ट अँड टर्न्सही फार ग्रेट नसल्यामुळे ही गोष्ट अधिक प्रेडिक्टेबल होते. फक्त अमिताभ बच्चन असल्यामुळे हा खेळ सुसह्य होतो. पण अपेक्षा घेऊन गेलेलो असतो तलवारीची पण इथे तर तलवारीने बुळबुळीत भेंडी कापल्याचा फिल अधिक येतो.
मुळात कथानक ज्या-ज्या वेळी बदलतं... त्यावेळी ते फिल्मी वाटतं... निदान पहिला सरकार अन् नंतरच्या सरकारराजमध्ये मेलोड्रामा होता. सूडाचा खेळ होता. त्या सगळ्यामध्ये गमावणं होतं... तत्त्वाची किंमत मोजावी लागली होती. त्या सगळ्यामध्ये एकप्रकारचा संघर्ष होता. आताच्या या टप्प्यावर त्यामधला संघर्ष अन् त्याची धारच कमी झाली आहे.
आताचा सरकार 3 हा सिनेमा विश्वासाच्या प्रश्नावर बोट ठेवतो. कारण आताच्या या घडीला सरकारला आपलं कोण, अन् परकं कोण हे कळत नाही. कारण राजकारणाच्या या खेळात तत्त्वनिष्ठ असल्याची किंमत मोजावी लागली. दोन्ही मुलं गमावली आहेत अन् संशयाची सुई फिरत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या गोष्टीला जी चमक अन् धार असणं गरजेची होती, ती मात्र नाही अन् त्यामुळे हा खेळ अधिक उठावदार झालेला नाही, ही खेदाची बाब आहे.
आता सुभाष नांगरे म्हणजे अमिताभ बच्चनचा नातू शिवाजी म्हणजे अमित साद आलाय. त्यामुळे त्याच्या नजीकच्या लोकांमध्ये नाराजी आहे, पण तोपर्यंत आपल्याला जाणवतं की, सरकारच्या माणसांच्या हातून ज्या श्रीराम बिल्डरची हत्या झाली, त्याची मुलगी यामी गौतम. तिच्या मनात सरकारवर सूड उगवायचा आहे अन् त्या सगळया माहौलात हा नातू देखील सरकारचा वाया गेलेला मुलगा विष्णूचा मुलगा त्यामुळे हा आता जवळ आला म्हणजे सरकारच्या जिवावर हे प्रकरण बेतणारं आहे. घातपात होणार, असा फिल देण्याचा प्रयत्न केला गेलेला आपल्याला दिसतो.
त्या सगळ्या खेळात नेमकं काय होईल... सरकारचा जीव धोक्यात आहे अशावेळी त्याचे निकटवर्तीय त्याची माणसं त्याच्यासोबत राहतात की, त्याचा नातू त्याचा कावेबाज हेतू साधतो... या साऱ्याचा ऊहापोह म्हणजे सरकार 3 .
अमिताभ बच्चन अन् रामगोपाल वर्मा तब्बल 8 वर्षांनी एकत्र आले आहेत. त्यामुळे या सगळ्या खेळात आपल्याला जाणवतं की, अमिताभ बच्चनसारखा कसलेला अभिनेता त्याचं काम चोखपणे करतो अन् त्यांच्या संवादफेकीवर तर जीव ओवाळून टाकावा असंच. पण यावेळी संवाद मात्र अगोदरच्या सिनेमांपेक्षा तशा अर्थाने परिणामकारक नाही.
तकलादू... व्हॉट्सअँपवर वाचायला चविष्ट वाटावे, असेच... पण मजा येत नाही. बहुतांश सिनेमातील खेळ तर अगोदरच्या यशस्वी समीकरणावरच बेतलेला. त्यामुळे आता इतक्या वर्षांनी सरकारचा फोन अपग्रेड झाला, पण सरकार अपडेट झाल्यासारखे वाटले नाहीत.
पण आपलं काम तितक्याच प्रेमाने अन् अत्यंत मनापासून करणारे अमिताभ बच्चन मात्र या सगळ्या गोंधळात भाव खाऊन जातात. त्यांच्या तोंडंचं मराठीपण गोड वाटतं... पण सुप्रिया पाठक मात्र ओढून ताणून बोलते असं वाटतं.
सगळ्यात हास्यास्पद कॅरेक्टर तर जॅकी श्रॉफचं वाटतं. तो अन् त्याची बेबी... त्यांचं काय चाललं... हेच कळत नाही. त्याच्या बेबीची अन् त्याची प्रश्नोत्तरं... अन् त्यांच्या भोवताली असलेला स्वीमिंग पूल नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे मासे... तो डॉन काय ... डॉनचा डुप्लिकेट असल्यासारखा वाटत नाही. तो काय तरी तिकडे करतोय इकडे त्याचे पिट्टू काय तरी करत आहेत. त्यांना फोनवर मार्गदर्शन करतो आहे. मुळात या कॅरेक्टर बद्दल भीती वा दरारा काही वाटत नाही. त्यामुळे त्याचा आलेख मोठा झाला नाही की जो सरकारला डोईजड होईल. त्यामुळे या सगळया खेळाचं गणितच कोलमडतं. मनोज वाजपेयीने साकारलेला देशपांडे हा राजकारणी त्यातल्या त्यात रंग भरतो... पण यापेक्षा त्याचं उत्तम काम राजनितीमध्ये आपण पाहिलं आहे. त्यामुळे आश्चर्याचा धक्का वगैरे बसत नाही.
गोकुळ म्हणून आपल्यासमोर येणारा रोनित रॉयला स्क्रीन प्रेझेन्स जेवढा आहे, तेवढी वाट्याला वाक्य नाही, पण तो लक्षात राहतो. गिन्याचुन्या सीन्समध्ये दिसणाऱ्या रोहिणी हट्टंगडी आपला ठसा उमटवतात. यामी गौतम तर खूप वेळ नजरेतच खेळली आहे. अमित साध हा आपली छाप पाडू शकला नाही. जितका तो आपल्याला काय पोछेमध्ये आवडून गेला होता तेवढाही तो चमकदार वाटत नाही. हिमालयाची सावली अंगावर घेणंही झेपायला हवं. अमिताभ सोबतच्या सीन्समध्ये तो चाचपडताना दिसतो. उत्तरोत्तर तर त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न डबिंगमध्ये केलेलाही जाणवतो. पण...
सरकारवरचा अटॅक अन् सारा खेळ बदलतो... त्यानंतर जिथे सिनेमावर पकड असायला हवी होती, तिथेच नेमकी पकड़ निसटली आहे.
यापूर्वीच्या सिनेमांमध्ये अमित रॉय यांचा कॅमेरा फ्रेमवर्क हे सिनेमाच्या यशाचं अन् चर्चेचा मोठा भाग होता, पण आता मात्र त्या पॅटर्नची कॉपी झालीय. त्या गोष्टीमागील सौंदर्यदृष्टीचा अभाव प्रामुख्याने जाणवतं.
अँलन आमीन यांचे अँक्शन सिक्वेन्स धूम वगैरेच्या लेव्हलचे नाहीत. ज्या माणसाने अँक्शनमध्ये पीएचडी केली, त्याला चौथीच्या स्कॉलरशिपचा पेपर सोडवायला दिला आहे. गीतकारांमध्ये मराठमोळ्या मंदार चोळकरचं नाव दिसतं ती जमेची बाजू.
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील बाप्पाची आरती ऐकायला मिळते.
पण एकूणच रामूचं गणित फसलंय. यशस्वी फ्रेंचायझीचा बो-या वाजवला आहे... कुऱ्हाडीवर पाय मारला काय अन् पायावर कुऱ्हाड... ज्या माणसाने रंगीला, सत्या, कंपनी, भूत, कौन सारखे सिनेमे केले आहेत. त्या माणसाने नाच, रोड, शोले वगैरे केलेले आहेत. त्यामुळे त्या इतका वाईट नसला तरी वाईट तो वाईटच नाही का, अमिताभ बच्चनसारखा हुकमी एक्का असूनही जर तुम्हाला तो तुम्हाला य़ोग्य पद्धतीने वापरता येत नाही, यापेक्षा आणखी मोठी खंत ती कोणती....
का पाहावा – अमिताभ अन् केवळ अमिताभच्या प्रेमापोटी
का टाळावा – माईंडगेमपेक्षा अजूनही खूनखराब्यात अडकलाय म्हणून
थोडक्यात काय – सरकारची हललेली झेरॉक्स
या सिनेमाला मी देतो दोन स्टार्स