सिनेमा हा दिग्दर्शकाचा असतो. म्हणूनच प्रत्येक सिनेमा कुणी बनवलाय हे पाहिलं जातं. म्हणजे, सिनेमा शाहरुखचा.. किंवा आमीरचा किंवा हृतिक रोशनचा असतोच. पण त्याही पलिकडे, त्यांना डायरेक्ट कोण करतंय यावर तो अवलंबून असतो. असो. शाहरुखबद्दल बोलायचं, तर त्याला त्याच्या छापातून मारुन मुटकून बाहेर काढणारे अत्यंत कमी दिग्दर्शक आहेत. म्हणजे, टिपिकल शाहरुख सोडून त्याला भूमिकेच्या चौकटीत नेण्यात यशस्वी झालेले सिनेमे होते स्वदेस, चक दे इंडिया, पहेली आदी. बाकी टिपिकल शाहरुख स्टाईल सिनेमे त्याने केलेच. यात ओम शांती ओम, चेन्नई एक्स्प्रेस अशा अनेक सिनेमांचा उल्लेख करता येईल. तर असा प्रकार असताना जेव्हा, झीरोसारखा विषय घेऊन शाहरुख आनंद एल राय यांना निवडतो तेव्हा आपल्या अपेक्षा उंचावतात. कारण आनंद एल रायने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शिवाय सिनेमे प्रोड्यूस करतानाही तो नेहमी वेगळी वाट चोखाळतो. अलिकडे आलेला तुंबाड या सिनेमालाही राय यांचं पाठबळ लाभलेलं. तर असा हा दिग्दर्शक जेव्हा शाहरुखचा हात हातात घेतो तेव्हा वाटतं की अब कुछ गजब होगा.. कुछ अलग होगा. पण झीरो पाहिल्यानंतर लक्षात येतं, की इथे शाहरुखने राय यांचा हात धरलेला नाही. तर राय यांनी शाहरुखचा हात धरलाय. म्हणजे, या सिनेमावर दिग्दर्शकाची पकड नाहीय तर शाहरुखचीच आहे. इथे त्याला काय हवं तेच त्याने केलंय. लोक यावेत म्हणून आधी ठोकताळे मांडून त्याने ते या सिनेमात घातले आहेत. पण गोष्टीला काय पूरक आहे, त्याचा विचार अशावेळी मागे पाडतो. म्हणूनच सिनेमा तांत्रिक अंगांबाबत उत्कृष्ट असला, तरी या सिनेमाची उत्तरार्धात झीरोच्या दिशेने वाटचाल सुरु होते.
सिनेमाच्या गोष्टीत कमालीची नाट्यमयता आहे. म्हणजे, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणारा बउवा सिंग उंचीने चार फूट 6 इंचांचा आहे. त्यामुळे वय 38 होऊनही त्याचं लग्न होत नाही. सिनेमे बघणे, उनाडक्या करणे असा त्याचा श्रीमंती थाट आहे. त्याची आवडती अभिनेत्री आहे बबिता. तिला एकदा तरी भेटावं अशी त्याची इच्छा आहे. इकडे त्याला लग्नही करायचं आहे. अशावेळी शास्त्रज्ञ असलेली आणि सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त अफिया त्याला आवडते. दोघांमध्ये मैत्री होते. लग्न ठरतं आणि बबिताला भेटायची संधी त्याला मिळते. मग बबिता, अफिया आणि बउवा यांचा अप्रत्यक्ष त्रिकोण तयार होतो. त्याची ही गोष्ट आहे झीरो. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शेवटी येणारं राॅकेटही महत्वाचं आहे. तर अशीही आतर्क्य गोष्ट दिग्दर्शकाने निवडली आहे.
आता उत्तर प्रदेश ते अंतराळ असा प्रवास तो गोष्टीत कसा दाखवतो याची उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. शिवाय जेव्हा आनंद राय आणि शाहरुख येतात तेव्हा काहीतरी कमाल होईल असं वाटून जातं. पण इथे जरा घोळ झालाय. सिनेमाचा पूर्वार्ध मस्त आहे. मजा येते तो पाहताना. पण उत्तरार्धामध्ये मात्र सिनेमा भरकटत जातो. त्यात बउवा डान्सर होतो. तो स्पर्धा जिंकतो. तिथे सलमान येतो. मग तिथून सिनेमा कुठे कुठे जातो हे आत्ता सांगितलं तर तुम्ही म्हणाल, चल.. असं कुठं असतं का? तेही बरोबरच आहे. म्हणूनच सिनेमा करताना त्याला स्थळ, काळ, वेळाचे दाखले द्यावे लागतात. ते न देता गोष्ट घडत गेली की त्या गोष्टीवरचा आपला विश्वास उडून जाऊ लागतो. इथेही तसं झालं आहे. लोकांना आवडले म्हणून त्यांनी सलमानला घेतलं आहे खरं. पण तो येण्यासाठी उगाच गोष्टीला पसरवलं आहे. हा बाज आनंद राय यांचा वाटत नाही. पुढे सिनेमात इतर अभिनेत्रीही येतात.. पाहुण्या कलाकार म्हणून. अशावेळी सिनेमापासून प्रेक्षक म्हणून आपण अलिप्त होतो.
या सिनेमात लक्षात राहते ती अनुष्का. अलिफाची भूमिका तिने मस्त केली आहे. शिवाय या भूमिकेसाठी तिने आपलं वजनही वाढवलं आहे. त्यामुळे तिला पाहायला मजा येते. तर कतरिनाने अभिनेत्रीचीच भूमिका केल्यामुळे ती खटकत नाही. आणि शाहरुख खान.. तो शाहरुख खान आहे. त्याची एनर्जी.. आणि त्याची स्टाईल त्याने इथे पुरेपूर कॅरी केली आहे. फक्त, इथे तो बउवा सिंग वाटत नाही. तर तो शाहरुखच आहे. छायांकन, संकलन आदी गोष्टी ठीक. संगीतामध्ये मेरे नाम तू.. हे गाणं बघायला छान वाटतं.
तर पटकथेमध्ये असा सगळा घोळ असल्यामुळे सिनेमा उत्तरार्धात झीरोच्या दिशेनं वाटताल करायला लागतो. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला आपण दिले आहेत, दोन स्टार्स. शाहरुखचे फॅन असाल तर हा सिनेमा जाऊन बघा. बाकी, काहीतरी वेगळं, भन्नाट पाहायला मिळेल अशी अपेक्षा असेल तर होल्ड... तो शाहरुखचा सिनेमा आहे.