हेमंतकुमार महाले दिग्दर्शित 'व्हॉटसअॅप लव्ह' हा सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. राकेश बापट, अनुजा साठे यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. सिनेमाच्या नावावरून हा चित्रपट तरूण पिढीसाठी किंबहुना त्या पिढीची मानसिकता दर्शवणारा असेल, असं वाटतं. कारण आज आपल्या सर्वांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलमध्ये व्हॉटसअॅप नाही असा एकही जण खरंतर सापडणार नाही. याच व्हॉटसअॅपभोवती फिरणारी एक गोष्ट दिग्दर्शकाने मांडली आहे. व्हॉटसअॅप जरी आजचं असलं तरी त्यातली गोष्ट ही जुनी आणि काही प्रमाणात कालबाह्य असल्यामुळे हा चित्रपट खूप आधी यायला हवा होता असं वाटून जातं.
आपल्या सुखी संसारात रमलेल्या आदित्यला एकेदिवशी एका अनोळखी नंबरवरून हाय हॅंडसम असा मेसेज येतो. आदित्य पहिल्यांदा चक्रावतो. काही दिवसांनी तो त्या व्यक्तीशी बोलू लागतो. या व्यक्तीने आपला व्हॉटसअॅप डीपी मोनालीसा ठेवला आहे. आपली खरी ओळख ती व्यक्ती लपवते. आदित्यला मात्र आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकीचा संशय यायला लागतो. पुढे ती व्यक्ती नेमकी कोण असते, त्याचा आदित्याच्या वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतो? यावर हा चित्रपट बेतला आहे.
चित्रपटाची कथा काहीशी गूढ वाटते. पण त्यातले प्रसंग हे न पटणारे आहेत. सलग एक वर्षभर कोणी एखादा अशा बिनचेहऱ्याच्या व्यक्तीशी बोलत असेल, हे न पटणारं आहे. पूर्वी हे होत असे. पण आताचा युवा सजग झाला आहे. इथे आदित्य तर एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा सुसंस्कृत तरूण मुलगा आहे. उत्तरार्धात तर त्याचं पेंटर असणं. मग त्याने मनाने चित्र काढणं आणि त्यातून ती युवती प्रगट होणं हे सगळंच गमतीदार आहे. त्यानंतर ती युवती त्याला सतत जागोजागी दिसत राहते हेही तितकंच आनाकलनीय. यामुळे चित्रपट जुन्या धाटणीचा वाटू लागतो. एक नक्की याची मांडणी चकचकीत झाली आहे. काही जर्क संकलनात आहेत. यातली गाणी, कव्वाली श्रवणीय वाटू शकली असती, अर्थात जर ती योग्य सीनमध्ये आली असती तर. इथे तो प्रकार खटकतो.
पिक्चरबिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत दोन स्टार्स. याची गोष्ट आजच्या काळातली असती तर हा चित्रपट नक्कीच रिलेट झाला असता. आजच्या तरूण पिढीला आपला वाटला असता.