नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बत्रा पुन्हा विवाहबंधनात
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2019 01:06 PM (IST)
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्राने नुकतीच अभिनेता नवाब शाह यांनी गुपचूप लग्न केल्याची माहिती आहे
मुंबई : भाई, विरासत यासारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूजा बत्रा पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याची माहिती आहे. बॉयफ्रेण्ड आणि अभिनेता नवाब शाहसोबत 42 वर्षीय पूजाने गुपचूप लग्न केलं. पारंपारिक पद्धतीने हा विवाहसोहळा झाल्याचं म्हटलं जात आहे. पूजाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हातात पंजाबी पद्धतीचा 'चुडा' भरल्याचा फोटो पोस्ट केला होता. पूजा आणि नवाब लवकरच आपल्या लग्नाची नोंदणीही करणार असल्याचं त्यांच्या जवळच्या मित्राने 'मुंबई मिरर'ला सांगितलं. नवाबच्या बहिणीच्या लग्नासाठी दोघं नुकतेच श्रीनगरला गेले होते. पूजाने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या आयुष्याच्या नव्या जोडीदाराविषयी अनेक वेळा सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच तिने नवाबसोबत फोटो शेअर करत त्याला 'मॅन क्रश' असं कॅप्शन दिलं होतं. 1993 साली मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत पूजाने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर 1997 साली 'विश्वविधाता' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर विरासत, भाई, हसीना मान जायेगी, कहीं प्यार ना हो जाये, नायक यासारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. नवाब शाह भाग मिल्खा भाग, दिलवाले, टायगर जिंदा है यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. आगामी पानिपत आणि दबंग 3 या सिनेमातही तो भूमिका करत आहे. 2003 साली पूजाने लॉस अँजेलसमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सोनू अहलुवालियासोबत विवाहगाठ बांधली होती. मात्र 2011 साली दोघांनी घटस्फोट घेतला. हा आपल्या आयुष्यातील अत्यंत खडतर, एकाकी टप्पा होता, असंही तिने घटस्फोटानंतर दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.