एक होता एकलव्य आणि एक होता अर्जुन. एकलव्य होता आदिवासी जमातीचा. तर अर्जुन होता राजपुत्र. एकलव्यही धनुर्धारी होताच. अर्जुनपेक्षा उत्तम नेमबाज होता तो. त्याने स्वत:ला सिद्धही केलं. पण जेव्हा द्रोणाचार्यांनी परीक्षा पाहीली. तेव्हा, गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी एकलव्याचा अंगठा मागून घेतला. कोणताही विचार न करता एकलव्याने तो दिला आणि अर्जुन आजवरचा सर्वश्रेष्ठ नेमबाज ठरला. एकलव्याला कधीच सर्वश्रेष्ठ मानलं गेलं नाही. तसं होण्यासाठी द्रोणाचार्यांनीही कधी राजघराणं सोडलं नाही.
एका पार्टीत भरपूर नाचकाम.. दारुबाजी केल्यानंतर काहीशा धुंद अवस्थेत आनंदकुमार एका सायकल रिक्षात बसतो. त्यानंतर शिक्षण, शिक्षणाची आस असलेली गरीब मुलं यांच्याबद्दल बोलताना हा रिक्षावाला आनंदकुमारला या गोष्टीची आठवण करुन देतो. त्यानंतर आनंदकुमारचे डोळे उघडतात. बिहारमध्ये गणिताचे द्रोणाचार्य म्हणून ओळख असलेले गणितज्ञ आनंदकुमार राजसत्तेची लालसा सोडून अशा अगणित एकलव्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याची तयारी दर्शवतात. अत्यंत गरीब असलेल्या 30 मुलांना हेरतात आणि त्यांना आयआयटी क्रॅक करणाऱ्या द्रोणाचार्यांची ही गोष्ट आहे. सुपर थर्टी. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशनची मुख्य भूमिका आहे आणि त्याच्यासोबत आहे मृणाल ठाकूर.
बिहारमधल्या आनंदकुमार यांची ही गोष्ट आहे. घरची परिस्थिती बेताची. वडील पोस्टात क्लार्क. पण मुलाला गणिताचं प्रचंड वेड. छोटा आनंद हुशार होता आणि गणितात जीनिअस. केंब्रिज विद्यापीठात मिळालेला प्रवेश पैशांअभावी हुकतो आणि रामानुजन विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळालेला आनंद पापड विकू लागतो. पण याच प्रवासात त्याला लालन भेटतो आणि मग गोष्ट पुढे जाते. अर्थात आनंदकुमार यांचा प्रवास आपल्याला नवा नाही. त्याच प्रवासाची ही गोष्ट आहे. अत्यंत हालाखीत जगणाऱ्या रोजंदारीवर राहणाऱ्या मुलांना आनंदकुमार यांनी शिक्षण देत आयआयटी क्रॅक कशी करवली त्याची ही गोष्ट.
खरंतर याचा ट्रेलर आल्यानंतर हृतिक रोशन आनंदकुमारच्या भूमिकेत फिट बसेल का, याबद्दल अनेक शंका लढवल्या जात होत्या. सिनेमा सुरु झाल्यानंतरही तसंच वाटू लागतं. म्हणजे हृतिक आनंदकुमारच्या भूमिकेत जात नाही. तर आनंदकुमार हृतिकसारखे दिसत असावेत असं वाटून जातं. कारण हृतिकचं एकूण फिजिक, फीचर्स पाहता त्याला सावळं केलं तरी त्याचं राजबिंड व्यक्तिमत्व लपत नाही. शेवटी ही गोष्ट शिक्षक आणि मुलांची आहे. त्यामुळे खरंतर वर्ग, बाक आणि अभ्यास या पलिकडे गोष्ट जायला फार वाव नाही. पण पटकथा लिहिताना गणित रोजच्या जगण्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा सिनेमा खिळवून ठेवण्याला झाला आहे. हॉस्पिटलमधले प्रसंग वाटतात रंजक. पण आठ महिन्यांत त्यांनी केलेली करामत पाहता ही मुलं आयआयटीयन्स न वाटता थ्री इडियटसमधली फुनसूक वांगडू आहेत की काय वाटू लागतं. पण दॅटस ओके.
यातले काही संवादही छान जमून आलेत. राजा वही बनेगा जो उसका हकदार है हा संवाद वारंवार येतो. शिवाय या चित्रपटातून शिक्षणाच्या नावाखाली बोकाळलेला व्यापारही अधोरेखित होतो. पंकज त्रिपाठी यांची व्यक्तिरेखा तेच अधोरेखित करते. यात आपली मराठमोळी मृणाल ठाकूरही आहे. सर्वसाधारणपणे अशा सिनेमात नायिकेचं फार काम नसतं. पण हा चित्रपट त्याला अपवाद आहे. मृणालचं काम छोटं आहे पण तिने ते अत्यंत आत्मविश्वासाने निभावलं आहे. तिच्या व्यक्तिरेखेला आलेख असल्यामुळे तिची भूमिका लक्षात राहते. यांसह आनंदकुमार यांच्या वडिलांची भूमिका साकारलेले विरेंद्रकुमार सक्सेना, आदित्या श्रीवास्तव, अमित साध हेही लक्षात राहणारे असेच.
ही प्रेरणादायी गोष्ट आहे. सिनेमात काही उन्नीस बीस असलं तरी आनंदकुमार यांचं काम खरंच मोठं आहे. सिनेमापेक्षा माणूस मोठा असल्यामुळे सिनेमा आपोआप मोठा झालेला दिसतो. सहकुटुंब पाहावा असा हा चित्रपट आहे. पिक्चर-बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत तीन स्टार्स.