मुंबई : 'फोर्ब्ज' मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत केवळ एका भारतीयाचा समावेश आहे. हा अभिनेता म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नाही, तर अक्षयकुमार आहे. अक्षयने रिआन्ना, जॅकी चॅन, ब्रॅडली कूपर यासारख्या भल्याभल्या कलाकारांना मागे टाकत 33 वं स्थान पटकावलं आहे.
65 मिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 444 कोटी 92 लाख 50 हजार रुपयांच्या घरात अक्षयची मालमत्ता असल्याची माहिती आहे. 'आयर्न मॅन' रॉबर्ट डाऊनी जुनिअर हा अक्षयच्या एक क्रमांक वर (66 मिलियन डॉलर) आहे. अभिनेत्री-गायिका टेलर स्विफ्टने या यादीवर वर्चस्व मिळवलं आहे. वयाच्या 29 व्या वर्षी टेलरची संपत्ती 185 मिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 1266 कोटी 37 लाख 12 हजार 500 रुपये इतकी आहे.
विशेष म्हणजे पहिल्या दोन्ही क्रमांकावर महिलांनी आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकन मॉडेल आणि व्यावसायिक कायली जेनर (170 मिलियन डॉलर), तिसऱ्या स्थानी अमेरिकन रॅपर, किम कर्दाशियनचा पती कान्ये वेस्ट आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लायनल मेस्सी आणि 'शेप ऑफ यू' फेम गायक इद शिरन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हाऊसफुल 4, गुड न्यूज हे सिनेमा या वर्षअखेरपर्यंत, तर लक्ष्मी बॉम्ब आणि सूर्यवंशी हे चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होतील. नुकताच त्याचा केसरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. गेल्या वर्षीही पॅडमॅन, गोल्ड, 2.0 हे एकामागून एक हिट सिनेमे त्याने दिले आहेत.
Forbes | जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अक्षय एकमेव भारतीय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2019 11:11 PM (IST)
65 मिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 444 कोटी 92 लाख 50 हजार रुपयांच्या संपत्तीसह अक्षयकुमार फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत 33 व्या क्रमांकावर आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -