वर्कोहोलिक असलेला सम्यक आणि त्याला प्रवासाच्या एका वळणावर भेटलेला इसम याची ही गोष्ट आहे. दैनंदिन जगण्यात आणि केवळ कामात अडकलेला सम्यक आणि निसर्गात रमणारा.. पेशन्स, रिअलायझेशन यांच्यावर कमालीचा विश्वास असणारा गृहस्थ यांच्यातलं द्वंद्व इथे मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. यातून जगण्याकडे नव्याने पाहण्याचं सूचना दिग्दर्शक करतो.
दत्ता भंडारे यांचा हा पहिला चित्रपट. त्यामुळे माध्यामाबाबत असलेला नवखेपणा यात जाणवतो. शिवाय चित्रपटाला पोषक कथेचा अभाव इथे दिसतो. ही कथा नाटक किंवा एकांकिकेची असावी असं वाटत राहतं. दोन व्यक्तिरेखा आणि एकच ठिकाण यामुळे हा चित्रपट प्रवाही न होता कमालीचा शब्दबंबाळ होतो. शिवाय यातली सम्यकच्या व्यक्तिरेखेबद्दलही अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचं वर्कोहोलिक असणं हे समजण्यासारखं आहे, पण त्याचवेळी त्याच आपल्या पत्नीवर, आईवर, मित्रांवर चिडचिड करणं हे अनाकलनीय आहे. त्यामुळे विनाकारण त्याच्या व्यक्तिरेखेला खलनायकी रंग प्राप्त होतो. पूर्वार्धात संथ असलेली पटकथा उत्तरार्धात वेगवान होते. उत्तरार्धात थरार आहे. पण संवांदांची सातत्याने होणारी पुनरावृत्ती मात्र खटकते.
संपूर्ण चित्रपट पाहताना एक जमता जमता राहिलेला चित्रपट असं वाटून जातं. संदीप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे यांनी नेटानं अभिनय केल्यामुळे चित्रपट खिळवून ठेवतो. पण त्यापलिकडे जगण्याचं तत्वज्ञान देणारा हा चित्रपट आणखी गोष्टीत भिजलेला हवा होता असं वाटून जातं. म्हणूनच पिक्चर-बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत दोन स्टार्स.