प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.. आठवतेय का कविता? बाणावरती खोचलेलं म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडणं अनेकांना पडला असेल. ज्यांना हा प्रश्न पडला त्यांनी कबीर सिंग पाहायला हरकत नाही. संदीप वांगा दिग्दर्शित कबीर सिंग हा शाहिद कपूर आणि कियारा अडवानी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आज (21 जून) प्रदर्शित होत आहे. 2017 मध्ये दक्षिणेत आलेल्या अर्जुन रेड्डी या सिनेमाचा हा रिमेक आहे. हे दोन्ही सिनेमे एकाच दिग्दर्शकाचे आहेत. मूळात त्यात काही फार वेगळं केलं आहे असं नाही. फ्रेम टू फ्रेम सिनेमा करण्याकडे दिग्दर्शकाचा कल आहे. आता तीही गोष्ट जुनी झाली. अगदी रावडी राठोडपासून हॉलिडेपर्यंत असे फ्रेम टू फ्रेम सिनेमे करण्याकडे दिग्दर्शकांचा कल आहे. त्याला हा कबीर सिंगही अपवाद नाही.

अर्जुन रेड्डीचा ट्रेलर पाहिलाय का तुम्ही? त्याचा ट्रेलर उपलब्ध आहे. तो पाहा. आणि त्यानंतर कबीर सिंगचा ट्रेलर पाहा. पार्श्वसंगीतापासून नायिकेच्या वेशभूषेपर्यंत सगळं सेम टू सेम दिसंत. फरक इतकाच की हिंदीचा ट्रेलर जास्त कॅची झाला आहे. हा ट्रेलर बघून काय वाटतं? कबीर सिंग हा अत्यंत वेडा माणूस आहे. तो पेशाने डॉक्टर आहे. पण आपल्या प्रेयसीचं लग्न झाल्यामुळे तो व्यथित झाला आहे. त्यानंतर त्याने स्वत:चंच आयुष्य स्वैराचाराधीन केलं आहे. यातून घडत जाणारी ही गोष्ट आहे. आपल्या मताशी, तत्वांशी प्रमाणिक असणारा.. आपल्या पेशावर कमाल प्रेम करणारा डॉ. कबीर कसा वाहवत जातो. तशा अवस्थेतही तो कसा सावरतो हे पाहणे म्हणजे कबीर सिंग.

प्रेमभंग नशिबी आल्यानंतर सगळ्या जगाकडे दुर्लक्ष करुन आपल्याला हवं तेच आपण करावं असा मनोवस्थेत प्रत्येकजण असतो. पण प्रत्येकाच्या अंगी ते धाडस किंवा तो वेडसरपणा असतोच असं नाही. कबीरमध्ये ते धाडसही आहे आणि तो वेडसरपणाही. शिवाय तो डॉक्टरकीत अव्वल आहे. ते त्याच्या आवडीचं काम आहेत. त्यामुळे त्यातून येणारा आत्मविश्वासही त्याच्याकडे आहे. तो अत्यंत हुशार आहे. जिनिअस आहे. त्यामुळे कमालीचा सॉर्टेड आहे. त्याच्या संवादांमधून ते येतं. आपल्याला हवं तेच करण्याकडे त्याचा कल आहे. डीनने माफी मागायला सांगितल्यानंतर डीन हा कॉलेजचा नोकर आहे. पण विद्यार्थी हा कॉलेजचा नसतो. तर ते कॉलेज त्या विद्यार्थ्याचं असतं, अशा संवादांमधून कबीर किती सॉर्टेड आहे ते कळतं. खूप छोटे छोटे संवाद मनात घर करतात.

सिनेमामध्ये अडचण आहे ती पटकथेची. पूर्वार्धात कबीर आणि त्याच्या भवतालचं वातावरण लक्षात येतं. पण त्यानंतर मात्र तोचतोचपणा यायला लागतो. म्हणजे, उत्तरार्धात कबीरचं सततचं दारु पिणं.. अंमली पदार्थ सेवन करणं हे खूप होतं. तोचतोचपणा यायला लागतो. सिनेमाची वाढलेली लांबी ती त्यामुळेच. ही लांबी वीस मिनिटं कमी करता आली असती तर गोळीबंद पटकथा तयार झाली असती असं वाटून जातं. आणि त्यातही सिनेमाचा शेवट. तो तर जरा जास्त फिल्मी झाला आहे. परिणामी तो हास्यास्पद होतो.

चित्रपटावर आपला ठसा उमटवतो तो शाहिद कपूर. हैदर, उडता पंजाब अशा चोख कामात आणखी एका कामाची भर पडली आहे ती कबीर सिंगची. डॉक्टरी पेशावर जीवापाड प्रेम करणारा, सणकी, आपल्या तोऱ्यात असणारा कबीर उत्तम साकारला आहे. शिवाय कियारा अडवानी, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता यांनीही चोख कामं केली आहेत.

सिनेमाची लांबी जरा कमी करता आली असती तर फरक पडला असता. दक्षिणेत ती लांबी चालली असतीही. पण आता हिंदी सिनेमा जास्त आटोपशीर आणि गोळीबंद होऊ लागला आहे. असो. म्हणूनच पिक्चरबिक्चरमध्ये कबीर सिंगला मिळत आहेत अडीच स्टार्स. सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही. अर्थात. यात मद्याचे, मद्यप्राशनाचे, चुंबनाचे अनेक अनेक अनेक प्रसंग आहेत. त्यावरुन कुणासोबत या सिनेमाला जायचं  ते ज्याने त्याने ठरवावं. चला आज इथे थांबू.