सिनेमे घेताना आपण कोणते सिनेमे घेतोय.. का घेतोय.. याचं काही भान मुळात ओटीटीवाल्यांना असतं की नाही असा प्रश्न आता पडू लागला आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित कुली नंबर 1 हा सिनेमा पाहता ओटीटीवाल्यांनी आपापल्या प्लॅटफॉर्मला लिंबू मिरची बांधायची गरज निर्माण झाली आहे. काही सिनेमे त्या त्या काळात आलेले चांगले असतात. त्यांचे रिमेक करणं खरंतर मूर्खपणाचं असतं. किंवा अगदीच रिमेक करायचा हट्ट असेल तर बदललेल्या काळानुसार त्याच्या गोष्टीत काही बदल होणं अपेक्षित असतं. बदल तेही आजच्या काळाला साजेसे. पण असं काही न करता केवळ सुमार विनोदनिर्मितीचा हट्ट आणि आपणच फार पूर्वी कधीतरी केलेल्या हिट सिनेमाच्या प्रेमाखातर सिनेमाचा रिमेक करणं हे निव्वळ हस्यास्पद तर आहेच शिवाय, अशा चित्रकृती चेष्टेचा विषय होतात. तसंच कुली नंबर 1 चं झालं आहे.


खरंतर कुली नंबर 1 हा सिनेमा ओरिजिनली आला होता तो 1995 ला. डेव्हिड धवन आणि गोविंदा ही जोडी त्यावेळी सॉलिड फॉर्मात होती. नंबर 1 चा नुसता हिटचा सिलसिला दिला होता. त्यातच होता हा कुली नंबर 1. डेव्हिड धवन यांनी जुडवाचा रिमेक केला. लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर डेव्हिड धवन यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी कुली नंबर 1 ही करायला घेतला. साहजिकच या सिनेमात वरुण धवन असणार हे उघड आहे. वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव अशी सगळी तगडी स्टारकास्ट असताना जुनाट गोष्ट आणि त्याची बोगस पटकथा यामुळे हा कुली नंबर वन ठरतो पण त्याचा नंबर शेवटून नंबर वन झाला आहे. फारच सुमार प्रसंग.. त्याचे अत्यंत उथळ संवाद आणि त्यात वरुण धवनच्या माकडचेष्टा यामुळे सिनेमाची पुरती वाट लागली आहे.


रेल्वे स्टेशनवर कुली असलेल्या नायकाच्या छातीवर अचानक एका सुंदर मुलीचा फोटो येऊन पडतो आणि त्यातून आता याच मुलीशी आपण लग्न करायचं असं तो ठरवतो. याकामी त्याला मदत करतो एक पंडित. त्याच मुलीचं लग्न नायकाशी लावून तिच्या वडिलांचं गर्वहरण करणं हेच त्या पंडितचं ध्येय असतं. त्यातून ही गोष्ट सुरु होते. मग नायक नायिकेला इम्प्रेस करण्यासाठी नवीनवी सोंगं आणू लागतो. या सोंगांना भूलून मुलीचा बाप आपल्या मुलीचा साराचा हात या सोंगी नायकाच्या हाती देतो आणि मग वडिलांची नजर कुली नायकावर पडते आणि यातून दोन्ही सोंगं सांभाळण्याच्या नादात हा भयंकर कॉमेडी ड्रामा आकाराला येतो.


बोगस पटकथा आणि हस्यास्पद प्रसंग, संवादांमुळे हा सिनेमा पुरता चुरगळला आहे. या सिनेमातला नायक राजू रेल्वेच्या टपावरुन धावत मुलाला वाचवतो असा अॅक्शन सीन तर आधीच चेष्टेचा विषय ठरला आहे. शिवाय, लग्नाआधी साराच्या खोलीत राजू गेल्यानंतर तिथे साराच्या वडिलांनी तिला योगासानाचे धडे देणं या प्रसंगात तर परेश रावल अत्यंत गरीबडे वाटू लागतात. राजू साराला प्रपोज करायला तिच्या रूममध्ये जातो आणि साराचा समजून तिच्या बहिणीचा हात हातात घेतो हा प्रसंग तर थ्री इडियट्समधून कॉपी पेस्ट केल्यासारखा झाला आहे. हा सीन पाहिल्यानंतर आपणच छातीवर हात ठेवून 'आल इज वेल' म्हणायची वेळ येते.


सिनेमातली गाणी म्हणाल तर त्यातलं तेरी भाभी खडी है.. हे गाणं ताल धरायला लावतं. पण त्यानंतर 'मैं तो रस्ते से जा रहा था', 'विंटर का मौसम है भाई'.. ही गाणी फारच ओंगळवाणी झाली आहेत. खरंतर 'मैं तो रस्ते से..' या गाण्याचा ओरिजिनल ताल सॉलिड होता. ते गाणं हिटही झालं होतं. पण या नव्या सिनेमात या रिमेकच्या गाण्यात आणखी काहीतरी हवं असल्यासारखं वाटतं. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती वरुण धवनच्या अभिनयाच्या मर्यादा या सिनेमात उघड होतात. तो दिसायला हॅंडसम असला तरी कुलीसाठी लागणारा इनोसन्स त्याच्याकडे नाही. अर्थातच हा सिनेमा गोविंदाच्या कुली नंबर 1 चा रिमेक असल्यामुळे पदोपदी गोविंदासोबत याची तुलना होणं अपरिहार्य आहे. (तशी ती जुडवावेळी सलमानसोबतही झाली होती.) इथे मात्र गोविंदा बाजी मारतो. साधा, सरळ नैसर्गिक अभिनय हे जुन्या कुलीचं यश होतं. इथे वरुणने तो जास्तच ड्रामेबाज केला आहे. यात त्या कुलीची वाट लागली आहे.


आपल्या मुलाला पडद्यावर विविध भूमिकांमधून दाखवण्याचा अट्टाहास डेव्हिड धवन यांना नडला आहे. राजू कुलीची भूमिका निभावतानाच वरुणला मिथुन, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, सलमान खान आदी अनेकांचे आवाज या सिनेमात देऊ केल्या आहेत. त्यामुळे एक ना घड भाराभर चिंध्या असा प्रकार झाला आहे. या सगळ्या सिनेमात जॉनी लिव्हर, साहिल वेद, शिखा तलसानिया हे कलाकारही आहेत. यांच्या भूमिकाही नको तिथे घुसडल्या आहेत.


हा सिनेमा पाहण्यात फार वेळ न दवडलेला बरा. त्यापेक्षा इतर काही ओटीटीवर काही चांगले सिनेमे आले आहेत. वरुण आणि डेव्हिड यांचा हा डाव भूताचा समजून सोडलेला बरा. आगे आपकी मर्जी. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळतोय एक स्टार.