रजनीकांत यांच्या 'अन्नाथे' या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच रोखण्यात आलं होतं. कारण क्रूमधील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर रजनीकांत यांनी स्वत:ला चेन्नईमधील आपल्या फार्महाऊसमध्ये क्वॉरन्टाईन केलं होतं.
महत्त्वाचं म्हणजे रजनीकांत 31 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे 'अन्नाथे'चं चित्रीकरण जवळपास नऊ महिन्यांसाठी थांबवण्यात आलं होतं. यानंतर 14 डिसेंबरपासून हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली होती. परंतु क्रूमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा चित्रीकरण रोखण्यात आलं.
दरम्यान अन्नाथे या चित्रपटाचं दिग्दर्शन सिरुथई सिवा करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नयनतारा आणि किर्ती सुरेश महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.