समीर जोशी दिग्दर्शित 'मिस यू मिस्टर' सिनेमाचा ट्रेलर आला आणि सिनेमाच्या अपेक्षा वाढल्या. कारण हा सिनेमा आज घराघरांत घडतो आहे. करिअर घडवण्यासाठी एकमेकांवर विश्वास दाखवून नवरा-बायको लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचा पर्याय निवडताना दिसतात. मग अशा अंतरात काय होतं? नाती कशी बदलतात? एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी, राग, उणीव हे कसं व्यक्त होतं? या सगळ्यांचा हा सिनेमा बनला असेल असं मनोमन वाटू लागतं. पण सिनेमा सुरु होतो. आपल्या वेगाने जाऊ लागतो. पण तो जाताना त्यात येणाऱ्या अडचणी. त्यातले प्रसंग पाहता हा चित्रपट लॉंग डिस्टन्स रिलोशनशिपवर बेतलेला नसून सामान्य नवराबायकोत असलेल्या संवादाच्या गॅपवर बेतला आहे की काय असं वाटतं.

समीर जोशी यांनी यापूर्वी मंगलाष्टक वन्स मोअर, बसस्टॉप, मामाच्या गावाला जाऊया असे सिनेमे केले आहेत. आता त्यांचा हा नवा सिनेमा. सिद्धार्थ चांदेकर-मृण्मयी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात सविता प्रभूणे, राजन भिसे, राधिका हर्षे, अविनाश नारकर यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचं कलादिग्दर्शन, संगीत, पार्श्वसंगीत नेटकं आहे.

गोष्ट अशी, कावेरी आणि वरुण यांची ही गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर काही महिन्यात वरुणला परिस्थितीमुळे लंडनला जावं लागतं. हा काळ 18 महिन्यांचा असतो. कावेरीचा निरोप घेऊन वरुण लंडनला जातो. दोघेही एकमेकांना विश्वासात घेतात. काही महिने उलटतात आणि मग कुरबुरी सुरु होतात. इकडे कावेरी आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहत आहे. तिचं माहेरही त्याच शहरात आहे. काही काळाने कुरबुरी सुरु होतात. समज गैरसमज मूळ धरू लागतात. त्या नात्यांचं पुढे काय होतं. हे अतंर कमी होतं की वाढतं? याचा हा सिनेमा आहे.

एकमेकांपासून दूर असल्यामुळे येणारी उणीव, पझेसिव्हनेस यावरून सिनेमातले प्रसंग तयार व्हायला हवे होते असं वाटतं. ते न झाल्यामुळे जाणूनबुजून वाद होतील असे प्रसंग यात घातले गेल्याचं दिसतं. त्याामुळे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप न उरता हा नवरा-बायको यांच्यातला वाद म्हणून उरतो. अर्थात सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे यांनी खूपच चांगली कामं केली आहेत. यातून दोघांमधलं ट्युनिंग खूपच चांगलं जमलं आहे. त्याला इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.

पटकथेत येणाऱ्या अनाकलनीय वळणांमुळे चित्रपटाची धार कमी होते. आज स्काईप, व्हीडिओ कॉल सगळं उपलब्ध असताना, वरुणचं दहा महिन्यांपासून आईला फोन न करणं पटत नाही. त्यात आई खूपच व्हॉटसअपसॅव्ही असताना. वरूण आधी 18 महिने लंडनला गेला असता त्याचा करार वाढतो. पण तो ते आपल्या बायकोला का सांगत नाही तेही कळत नाही. मग एक दिवस तिला हे कळल्यानंतर व्हायचा तो स्फोट होतो. या प्रकारामुळे ही गोष्ट लॉंग डिस्टन्सची उरत नाही.

पिक्चर बिक्चरमध्ये मिस यू मिस्टर चित्रपटाला मिळताहेत दोन स्टार्स. कथाबीज चांगलं असूनही त्याची पटकथा, त्यातले प्रसंग अधिक गुंतागुंतीचे असते तर या गोष्टी सहज झाल्या असत्या असं वाटून जातं. मृण्मयी-सिद्धार्थची केमिस्ट्री पाहायची असेल तर हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

चित्रपटाचा ट्रेलर पाहा