फानयली ज्या सिनेमाची आपण आतुरतेनं वाट पाहात होतो तो सिनेमा आला आहे. 2.0 प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत यांचा सुपर सिनेमा असल्यामुळे खरंतर या सिनेमात इतर कोणीही कास्ट नसली तरी चाललं असतं. अगदी कॅमेरा न वापरता मोबाईल वापरला तरी लोक तो पाहतील कारण लोकांचं रजनीकांतवर अपार प्रेम आहे. त्या या सिनेमात अक्षयकुमार असल्यामुळे अक्कीच्या चाहत्यांसाठी हा दुग्ध शर्करा योग मानायला हवा. तर अशामुळे 2.0 कडे लोकांचं लक्ष लागलं आहे. असो.


आता थेट समीक्षेवर येऊया. या सिनेमाचा दिग्दर्शक शंकर असल्यामुळे या सिनेमाकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा बाळगायला हरकत नाही. कारण शंकर अत्यंत अनुभवी दिग्दर्शक आहे. गोष्ट आणि तंत्र याचा मेळ तो नेहमी घालण्याचा प्रयत्न करतो. इथे तर त्याने अनेक वर्ष खपून हाॅलिवूडच्या तोंडात मारेल असं ग्राफिक्स करून घेतंल आहे. याची गोष्टही चांगली आहे. सिनेमाचा ट्रेलर तर आपण सर्वांनी पाहिला आहे. तीच वन लाईन आहे. सगळं सुरळीत सुरू असताना, अचानक एक दिवस शहरातले मोबाईल गायब होतात. एका विशिष्ट अंतरावर जाऊन त्यांचा माग लागत नसतो. पाहता पाहता या मोबाईल्सचा एक पक्षी तयार होतो आणि शहर बेचिराख करू लागतो. मग त्याचा बिमोड करायचा कसा असा प्रश्न राज्यकर्त्यांना सतावू लागतो. आणि मग अनुभवी, हुशार, ज्येष्ठ, श्रेष्ठ, माणूसकीचं दैवत असा शतकाचा महामानव असलेल्या प्रोफेसर वसीकरण यांना बोलावलं जातं. वसीकरण आपल्या कुवतीनुसार प्राथमिक अंदाज बांधतात. या शक्तीला रोखण्यासाठी आता एकच महामानवाची गरज असल्याचं स्पष्ट करतात आणि चिट्टी बाहेर येतो. मग हा चिट्टी त्या पक्षाला कसा रोखतो त्याची ही गोष्ट 2.0.

या सगळ्या सिनेमाचा महानायक रजनीकांत आहेच. पण त्याच्यानंतर जर कोणी या सिनेमाला तारलं असेल तर ते व्हीएफएक्सने. अत्यंत कमाल तंत्राने हा सिनेमा बांधला आहे. त्यामुळे तो कुठेही खोटा वाटत नाही. या सिनेमात अक्षय आहेच. पण तो आपल्याला असा भारी अक्षयकुमार वाटत नाही. म्हणजे, अभिनयाला फार वाव नसलेला अक्षय असं याचं वर्णन करता येईल. एक नक्की, त्याला केलेला मेकअप कडक आहे. त्यामुळे त्याला फार भाव म्हणजे एक्स्पेशन देता आलेले नाहीत. पण डोळ्यातून तो चांगला व्यक्त झालाय. अर्थात रजनीसोबत अक्षयला पाहायला मजा येते. अभिनयाबाबत रजनीसरांनी आपल्यासाठी फुल ओव्हर राखून ठेवली आहे. म्हणजे, यात ते वसीकरण म्हणून समोर येतात. त्यानंतर सोबर असा चिट्टी रोबो दिसतो. आणि त्याही पलिकडे येतो 2.0 चिट्टी. म्हणजे चिट्टीचं पुढचं व्हर्जन. त्याचा आपला असा वेगळा, भारी ढंग आहे. सोबत एमी जॅक्सन आहे. आणि शहरात वावरणारे शेकडो सेरावैरा धवणारे लोक आहेत.

दिग्दर्शकाने निवडलेली ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजे, गोष्ट म्हणून त्याला अर्थ आहेच. त्या गोष्टीत रजनीकांतला पुरेपूर फुटेज दिलंय त्यानं. पण सोबत, त्यातून एक मेसेजही दिला आहे. मोबाईल रेडिएशन्समुळे पक्षांचा जीव कसा धोक्यात आला आहे.,. चिमण्यांची संख्या कशी कमी होऊ लागली आहे, ते यात अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट एक फॅंटसी असला, तरी तो वास्तवदर्शी वाटतो. फक्त उत्तरार्धातला क्लायमॅक्स जरा मोनो झाला आहे. म्हणजे, नायकाने केलेली खलनायकावरची मात पाहायला मजा येते, पण त्यापूर्वी खलनायकाला ब्लॅकमेल करण्यासाठी तो जे काही गेम करतो, ते कारण आणखी वेगळं असायला हवं होतं असं वाटून जातं.

यापूर्वी रजनीकांतचे आलेले काला, कबाली या चित्रपटांना कथा नावाचा भाग नावाला होता. रजनीकांत आहे म्हणून सिनेमा चालतो अशीच बाब होती. पण बऱ्याच दिवसांनी चांगली गोष्ट घेऊन रजनीचा सिनेमा आला आहे. अबालवृद्धांनी पहावा असा हा सिनेमा आहे. त्यामुळे त्याचा आनंद थिएटरमध्ये जाऊन घ्यायला हरकत नाही. हा सिनेमा तंत्रज्ञानाचा उत्तम अविष्कार आहे. अनेक वर्ष खपून शंकर यांनी हा चित्रपट बनवला आहे. तो आवर्जून पाहायला हवा.

तर असा हा 2.0 हा सिनेमा आहे. सर्वसाधारणपणे आपण चित्रपटाला स्टार देतो. पण रजनीकांत ज्या सिनेमात असतात त्याला स्टार मिळत नसतात. कारण तो चित्रपटच एक झगमगता स्टार असतो. म्हणूनच आपण या चित्रपटाला देतोय, एक नव्हे, दोन नव्हे, तर चार चिट्टी रोबो.