नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून पब्लिसिटी स्टंट करणाऱ्या राखी सावंतने तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती दीपक कलाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे तिने म्हटले आहे. लग्नाच्या पत्रिकेसह तिने दोघांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. राखीने शेअर केलेली लग्नपत्रिका दीपक कलालनेही त्याच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे. पत्रिकेत लग्नाची तारीख 31 डिसेंबर आहे. लॉस एंजेलिसमध्ये दोघे लग्न करणार असल्याचे राखीने म्हटले आहे.
एक महिन्यापूर्वी दीपक कलालने राखी सावंतला इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून प्रपोज केले होते. परंतु राखीने यावर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय तेव्हा राखी म्हणाली होती की, "या जगात दीपक कलाल एकटाच लग्नासाठी उरला तरीही मी त्याच्याशी लग्न करणार नाही." त्यानंतर राखीने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केले. राखीने दीपकला सल्ला दिला होता की, त्याने लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाकावा.
काही वर्षांपूर्वी राखी का स्वयंवर या कार्यक्रमात राखीने इलेश पारूजानवालाशी साखरपुडा केला होता. कार्यक्रमात त्या दोघांनी लग्न केल्याचे दाखवले होते. कार्यक्रम संपल्यानंतर एका महिन्याने दोघेही विभक्त झाले.
राखीने लग्नाच्या पत्रिकेचे फोटो अपलोड केले आहेत. परंतु अनेकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. राखी खरंच लग्न करणार आहे की, हा सुद्धा तिचा नेहमीप्रमाणे पब्लिसिटी स्टंट आहे, हे 31 डिसेंबरला आपल्याला समजेल.