"बनावट धाड टाकून मला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी केस मिटवण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली. इतकंच नाही तर तू पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची गर्लफ्रेंड आहेस, तर आम्हाला 'खूश' कर", असंही पोलीस म्हणाल्याचा दावा आर्शी खानने केला आहे.
काही दिवसांपूर्वीच आर्शी खानला पुणे पोलिसांच्या सामजिक सुरक्षा विभागाने वेश्या व्यवसायाच्या आरोपाखाली एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं होतं. मात्र आर्शी खानने हडपसर सुधारगृहातून धूम ठोकली.
त्यानंतर आता आर्शी खानने पोलिसांवर आरोप केले आहेत.
"पोलिसांनी पैसे आणि शारिरीक सुखाची मागणी केली. ज्या विपुल नावाच्या व्यक्तीला माझ्यासोबत पकडलं, तो इव्हेंट शो आयोजक सांगत होता. तो सातत्याने फोन करत होता. मात्र मी भेट नाकारूनही तो शोध घेत हॉटेलवर आला. तितक्यात पोलिसांनीही एण्ट्री केली आणि रेड टाकल्याचं सांगत मला अटक केली" असं आर्शी खानने म्हटलं आहे.
पोलिसांचा दावा
दरम्यान, पोलिसांनी आर्शी खानचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
"सर्व कारवाई कायदेशीर केली आहे. आर्शी खानविरोधात आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्ही कोर्टात ते सादर करु. दलाल विपुल आणि तीचं बोलणं झालं होतं. या महिलेकडे दोन आधार कार्ड आहेत.त्यात एक मिरारोड आणि एक भोपाळ या ठिकाणचे आहेत. तसेच दोन पॅन कार्डस आहेत, त्यावर वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. तिला ज्यावेळी ताब्यात घेतले त्यावेळी तिने पोलिसांना कुठल्याही प्रकारची माहिती किंवा माहितीला प्रतिसाद दिला नाही" असं पोलिसांचं म्हणणं आहे.
कोण आहे अर्शी खान?
अर्शी खान ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे.
अर्शी खान आणि शाहिद आफ्रिदीचं अफेअर?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत अर्शी खानचं अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. दुबईतील एका हॉटेलमध्ये दोघांना एकत्र पाहिल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं होतं.
संबंधित बातम्या
मॉडेल अर्शी खान पुण्यातील सुधारगृहातून पळाली