'पल पल दिल के पास' या जुन्या गाजलेल्या गाण्याला अभिजीत वाच्छानीने नवीन स्वरसाज चढवला आहे. रजनीश दुग्गल, सना खान आणि शर्मन जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'वजह तुम हो' चित्रपटातील या गाण्याला अरिजीतने आवाज दिला होता. मात्र आपल्या आवाजाला संगीतकाराने अनावश्यक ट्यून केल्याचा दावा अरिजीत सिंगने केला आहे.
'काही जण कारण नसताना इतके स्मार्ट वागण्याचा प्रयत्न का करतात, हे समजत नाही. अभिजीत वाच्छानी तू माझा आवाज इतक्या टोकाचा ट्यून करण्याची गरज नव्हती. मला मूळ गाणं इतकं आवडतं, की या रेंडिशनची मला लाज वाटते. तू माझा आवाज इतका बदललास, की मलाच तो ओळखू येत नाहीये. मला इतकं वाईट संगीत ऐकवल्याबद्दल आभार.' असं अरिजीतने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
किशोर कुमार यांनी गायलेल्या मूळ गाण्याचा हा अवमान असल्याचं अरिजीतला वाटतं. तू टॅलेंटेड म्युझिक प्रोड्युसर आहेस पण आपलं काम संपलं. माझी फसवणूक केल्याबद्दल आभार. वाच्छानीने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही.
यापूर्वीही अभिनेता सलमान खानसोबत अरिजीत सिंग याचा वाद झाला होता. त्यानंतर अरिजीतने फेसबुकवर स्पष्टीकरण देणारी पोस्ट लिहिली होती.