Anil Kapoor Mithun Chakraborty : करिअरला कलाटणी देण्यासाठी फक्त एक संधी पुरेशी असते. मिळालेल्या एका संधीचे सोने करता आले पाहिजे. अशीच एक संधी बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता अनिल कपूरच्या (Anil Kapoor) सिनेकारकिर्दीत आली. मात्र, यातही अनेक अडचणी होत्या. भावालाच संधी दिल्याने निर्मात्याने आपला हात आखडता घेतला. तर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे नाराज झाली होती. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.
मिथुनदाने दिला होता चित्रपटाला नकार...
हम पाँच चित्रपटाच्या यशानंतर बोनी कपूर यांनी नव्या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचे नाव होते, सात दिन. या चित्रपटात बोनी कपूर हे त्यावेळचा स्टार मिथुन चक्रवती याला घेणार होते. मात्र, स्टारडम मिळालेल्या मिथुनने या चित्रपटाला नकार दिला. तर, दुसरीकडे बोनी कपूरचा भाऊ अनिल कपूर चित्रपटात काम करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवत होते. अनिल कपूरने आपल्या भावाला बोनी कपूरला कामासाठी विनंती केली. पर्याय नसल्याने बोनी कपूरने अनिलला संधी दिली. मात्र, चित्रपटात नवा चेहरा असल्याने इतर फायनान्सरने हात आखडता घेतला. तर, दुसरीकडे नवख्या अभिनेत्यासोबत काम करावे लागणार म्हणून अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेदेखील नाराज झाली होती.
बोनी कपूरने लढवली शक्कल...
पद्मिनी कोल्हापुरीला आपल्यासारख्या रिजेक्टेड कलाकारासोबत काम करण्यासाठी तिची समजूत घालणे हे गरजेचं आहे, हे अनिल कपूरला समजलं होतं.चित्रपटात आणखी कोणीतरी नावाजलेले नाव जोडावे लागेल जेणेकरून फायनान्सर चित्रपटासाठी पैसे खर्च करण्यास तयार होतील हे बोनी कपूरला समजले. त्यामुळे बोनी कपूर यांनी नसीरुद्दीन शाह यांना विचारणा केली. त्यांनी सांगितलेल्या मानधनावर बोनी कपूर यांनी तातडीने होकार कळवला. नसीरुद्दीन शाह यांच्या नावावर पैसे लावण्यास फायनान्सर तयार झाले.
पद्मिनी कोल्हापुरीची नाराजी दूर करण्यासाठी अनिल कपूरने तिला रोज स्वादिष्ट पदार्थांनी भरलेला टिफिन पाठवायला सुरुवात केली. मग तिचीही नाराजी दूर झाली. त्यानंतर हा चित्रपट पूर्ण झाला आणि हिट झाला.
उधारी मागून चित्रपटांचे हक्क घेतले...
'वो 7 दिन' हा चित्रपट तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.प्रसिद्ध दिग्दर्शक के भाग्यराज यांचा हा चित्रपट होता. तेच या चित्रपटाचे मुख्य अभिनेते देखील होते.या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याची जबाबदारी बोनी कपूर यांनी घेतली होती. या चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठी बोनी कपूर लहान भाऊ अनिल कपूरसोबत चेन्नईलाही गेला होते. पण चित्रपट विकत घेण्यासाठी पैशांची कमतरता होती. बोनी आणि अनिल यांनी अभिनेते संजीव कुमार यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यावेळी ते चेन्नईमध्येच त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. याशिवाय शबाना आझमी यांच्याकडून काही पैसे उधार घेऊन चित्रपटाचे हक्क विकत घेतले.