Amitabh Bachchan : 'बिग बी 'अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे भारतीय सिनेसृष्टीमधील सुपरस्टार आहे. बॉलिवूडचे शहेनशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांचे स्टारडम कायम आहे. मागील काही दशकांपासून अमिताभ बच्चन हे भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. बिग बींची बॉलिवूडमधील सेकंड इनिंगही मोठी दमदार आहे. मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावरही अमिताभ बच्चन यांची हुकूमत असल्याचे दिसते. अमिताभ बच्चन हे मुंबईतील जलसा बंगल्यात राहतात. अमिताभ यांचा शेजारी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी खऱ्या अर्थाने स्टारडम कमावले आहे. त्यांची एकूण संपत्ती ही अंदाजे 1578 कोटी रुपयांच्या घरात आहे. अमिताभ हे पत्नी जया बच्चन आणि मुलांसोबत मुंबईत राहतात. बिग बी दर रविवारी त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येतात. हा भव्य बंगला 10,125 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला आहे आणि त्याची किंमत 100-120 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
अमिताभ यांच्या शेजारचा बंगला खरेदी करू शकता...
'मनीकंट्रोल' मधील एका वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्याशेजारी एक बंगला विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. डॉयचे बँकेने या भव्य मालमत्तेचा 25 कोटी रुपयांना लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची EMD रुपये 2.50 कोटी असणार आहे. बँका सहसा लिलावासाठी किंमती बाजार मूल्यापेक्षा थोड्या कमी ठेवतात, त्याचप्रमाणे, अमिताभ बच्चन यांच्या शेजारी असलेल्या या बंगल्याची मूळ किंमत 35-40 कोटी रुपये असू शकते. लिलावात या बंगल्याला किती रुपयांची बोली लागेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
'जलसा'मधील बिग बींची आवडीची जागा
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये जलसा बंगल्याबद्दल भाष्य केले होते. त्यांनी या बंगल्यातील आपल्या आवडीची जागा सांगितली होती. या घरात रेकोर्डिंग रुम आपल्या आवडीची जागा असल्याचे त्यांनी नमूद केले होते. या ठिकाणी संगीतातील सप्तस्वराचा एक वेगळा अनुभव मिळतो असे त्यांनी सांगितले होते.