मुंबई : मराठी कलाकारांना मुंबईत हक्काचं घर घेता यावं, म्हणून 'म्हाडा'ने मोठा निर्णय घेतला आहे. मराठी कलाकारांना एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घरं दिली जाणार, अशी घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली.

मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांना म्हाडाच्या निर्णयाचा लाभ होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक भागातील कलाकारांना विरारमधील घरं दिली जाणार आहेत. उदय सामंत आणि शिवसेनेचे चित्रपट सेना अध्यक्ष आदेश बांदेकर यांची आज मराठी कलाकारांच्या घरांच्या प्रश्नावर बैठक पार पडली. त्यानंतर उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय घेतला.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घेटनाग्रस्त तिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यासाने दत्तक घ्यावे, अशी विनंती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना केली. यावेळी, गाव दत्तक घेण्यासंदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यास सकारात्मक विचार करेल, असं आश्वासन आदेश बांदेकर यांनी उदय सामंत यांना दिलं.

तिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यासाने दत्तक घेतलं, तर दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन सिद्धीविनायक मंदिर न्यासामार्फत करण्यात येईल, असंही बांदेकरांनी सांगितलं.

दुसरीकडे, महाराष्ट्रात 14 हजार 621 घरांची लॉटरी निघणार असून मुंबईत गिरणी कामगारांसाठी 5 हजार 90 घरांची लॉटरी निघेल. येत्या 15 ऑगस्टच्या आधी लॉटरीची जाहिरात निघणार आहे. पुण्यात 2000, नाशिकमध्ये 92, औरंगाबादमध्ये 148, कोकणात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 5300, नागपूरमध्ये 898, अमरावतीमध्ये 1200 घरांची सोडत जाहीर होणार आहे.