मुंबई : #MeToo वादात अडकलेले अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी (16 नोव्हेंबर) राज्य महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर दिलं आहे. तीन पानांच्या या उत्तरात नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. "या प्रकरणाची पोलिसात नोंद झाली असून ते तपास करत आहेत. या प्रकरणी मी यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही," असंही नाना पाटेकर यांनी पत्रात लिहिलं आहे.


तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. दहा वर्षापूर्वी नानाने गैरवर्तन केल्याचं तनुश्रीने म्हटलं आहे. त्यानंतर देशभरात विविध क्षेत्रात मी टूचं वादळ उठलं आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात महिला आयोगाचा दरवाजा ठोठावून न्याय देण्याची विनंती केली होती. यावर महिला आयोगाने नाना पाटेकर यांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं.

काय आहे प्रकरण?


बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण काही दिवसांपूर्वी सांगितली होती. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. 'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असा दावा तनुश्रीने केला.

'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला होता. तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री म्हणाली होती.

तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

2003 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'आशिक बनाया आपने' हा सिनेमा गाजल्यानंतर तिने चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीडसारखे काही सिनेमे केले. 2010 नंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण तिने यापूर्वीही नाना पाटेकरांबाबत घडलेला हा किस्सा अनेकवेळा सांगितला आहे.

दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं.

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर उत्तर देणं नाना पाटेकर यांनी टाळलं होतं. जे खोटं आहे, ते खोटं आहे, असं म्हणत मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचं नाना पाटेकर म्हणाले. तर तनुश्री दत्ताच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही, असं दिग्दर्शक राकेश सारंग यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात, असं ती म्हणाली.

#MeToo चं वादळ

अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला होता. विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून अत्याचाराला वाचा फोडली.

कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.

#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या

तनुश्रीच्या तक्रारीनंतर नाना, सारंग, आचार्य, सिद्दीकींवर गुन्हा

मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला : नाना पाटेकर 

तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग  

राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता

तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया

तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला

बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर 

नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे  

मनसेचा प्रचार ब्ल्यू प्रिंटने, तर भाजपचा ब्ल्यू फिल्म दाखवून : राज ठाकरे  

राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना