पटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीचा कार्यक्रम आणि गोंधळ हे एक समीकरणच झाले आहे. 15 नोव्हेंबर रोजी बिहारमधील बेगूसराय येथे तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे झालेल्या गोंधळात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
उत्तर भारतात सपना चौधरीचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यामुळे बेगुसराय येथील कार्यक्रमाला सपनाच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. ती तिच्या कार्यक्रमासाठी पोहचली तेव्हा आयोजकांना गर्दी आटोक्यात ठेवणे शक्य झाले नाही. त्यामुळे गोंधळ झाला. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला.
गर्दी नियंत्रणात आणणे शक्य नसल्याचे आयोजकांच्या लक्षात आल्यानंतर आयोजकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नाईलाजास्तव पोलिसांना गर्दीवर लाठी चार्ज करावा लागला.
बेगुसराय येथे छट पुजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये परफॉर्म करण्यासाठी सपना चौधरीला आंमत्रित करण्यात आले होते.सपनाला पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी जमली होती. सदर परिसरात क्षमतेपेक्षा अधिक पटींनी गर्दी झाली होती. त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला.
कार्यक्रमापूर्वी सपनाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ती सध्या बिहारमधील थंडीची मजा घेत असल्याचे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.