Mehmood Birth Anniversary : आपल्या बहारदार विनोदांनी प्रेक्षकांना मनसोक्त हसवणारे ‘कॉमेडी किंग’ अभिनेते मेहमूद अली (Mehmood) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते या जगात नसले, तरी चाहत्यांच्या मनात त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. अभिनेते मेहमूद अली यांचा जन्म 29 सप्टेंबर 1933 रोजी मुंबईत झाला होता. मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करायचे. घरच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मेहमूद मालाड ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट-गोळ्या विकायचे. लहानपणापासून मेहमूद यांचा अभिनयाकडे कल होता आणि त्यांना अभिनेता बनायचे होते.
एकदा वडिलांसोबत सेटवर गेले असता, त्यांना एका चित्रपटात अभिनेते अशोक कुमार यांच्या बालपणाची एक छोटीशी भूमिका देखील करायला मिळाली होती. अभिनेता बनण्याची इच्छा आणि स्वप्ने सत्यात उतरवण्याच्या ध्यासाने मेहमूद यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यांनी चरितार्थासाठी अनेक कामे केली. पैसे कमवण्यासाठी त्यांनी दिग्दर्शक पीएल संतोषी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम केले. या कामासाठी त्यांना 75 रुपये पगार मिळायचा. एकेकाळी ते प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीला टेबल टेनिसही शिकवायचे.
‘नादान’ चित्रपटाने मिळवून दिली संधी
'नादान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलग दहा वेळा रिटेक करूनही अभिनेत्री मधुबालासमोर ज्युनिअर आर्टिस्टला त्याचे संवाद बोलता आले नाहीत, तेव्हा ही संधी मेहमूद (Mehmood) यांना मिळाली. चित्रपट दिग्दर्शक हिरा सिंह यांनी मेहमूद यांना हा डायलॉग बोलण्यास सांगितले, जो त्यांनी एकही रिटेक न करता एका दमात बोलून दाखवला. या चित्रपटासाठी मेहमूद यांना 300 रुपये मिळाले होते. अभिनय क्षेत्रात नावाजल्यानंतर त्यांना चित्रपटातील हिरोपेक्षा देखील अधिक मानधन दिले जायचे.
स्वाभिमान महत्त्वाचा!
मेहमूद जे काम हाती घेतील, ते मन लावून पूर्ण करायचे. मात्र, त्यांना कधीच कुणाची शिफारस नको होती. एकदा मीना कुमारी यांनी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक बीआर चोप्रा यांना सांगितले की, तुम्ही तुमच्या चित्रपटात मेहमूद यांना भूमिका जरूर द्या. जेव्हा मेहमूद (Mehmood) यांना ही शिफारस कळली, तेव्हा त्यांनी चित्रपट करण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि चित्रपटातून बाहेर पडले. कोणत्याही शिफारशीमुळे नाही तर, स्व:मेहनतीवर आपल्याला काम मिळावे, अशी त्यांची इच्छा होती.
कॉमेडियन म्हणून मेहमूद यांचे ‘दिल तेरा दिवाना’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘मैं सुंदर हूं’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘नोकर’, ‘पडोसन’ हे चित्रपट लोकप्रिय ठरले. मेहमूद यांच्यावर चित्रित केलेले मोहम्मद रफी यांचे गाणे आजही लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. 1970च्या दशकात असरानी, कादर खान आणि जगदीप सारख्या नवीन विनोदी कलाकारांच्या पदार्पणानंतर मेहमूद (Mehmood) यांची कारकीर्द उतरणीला लागली. अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता राजकुमार संतोषी यांचा ‘अंदाज अपना अपना’. मेहमूद यांच्या ‘कुंवरा बाप’ या चित्रपटात त्यांच्या वास्तविक जीवनाची कथा होती.
हेही वाचा :