TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


'हर हर महादेव' शिवगर्जना घुमणार रुपेरी पडद्यावर


मराठमोळा अभिनेता सुबोध भावे एक अभ्यासू अभिनेता असून नेहमीच तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडत असतो. आज सुबोध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुबोधचा 'हर हर महादेव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. 


अजय देवगनच्या 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा संपली


बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या आगामी 'दृश्यम 2' या सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 'दृश्यम' हा सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अजय देवगन, तब्बू, श्रिया सरन महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा करत होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवं वळण


'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येत असणाऱ्या नव्या ट्विस्टमुळे मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर आली आहे. मालिकेत नेहा प्रेग्नंट असल्याची घरच्यांना चाहुल लागली आहे. त्यामुळे आता नेहा खरंच आई होणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


आलियाने रणबीरला दिलं खास बर्थडे गिफ्ट


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आलियासाठी 2022 हे वर्ष वैयक्तिक कारणांसह व्यावसायिकरित्यादेखील खास आहे. आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत असून आज रणबीरच्या वाढदिवशी आलियाने पुन्हा एकदा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी आलियाची निवड झाली आहे. 


परिणीती चोप्राच्या 'कोड नेम तिरंगा' सिनेमात पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका


बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चर्चेत आहे. तिच्या आगामी 'कोड नेम तिरंगा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 


मराठमोळ्या 'पल्याड' चित्रपटाचा डंका


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरत पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या 'पल्याड' या मराठी चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 'फोर्ब्स' मासिकानं घेतली आहे.


'सम्राज्ञी'; लतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. जगभरातील चाहते आज लता दिदींना आदरांजली वाहत आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. लता दीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध  संगीतकार मयुरेश पै  हे करणार आहेत. 


साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचे  हैदराबाद येथे निधन झाले आहे. इंदिरा देवी यांनी बुधवारी (28 सप्टेंबर) पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा देवी यांची प्रकृती बिघडली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


विजय सेतूपतीसोबत तुलना होण्याच्या चर्चांवर हृतिकनं सोडलं मौन


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा विक्रम वेधा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. हृतिकनं या चित्रपटात वेधा या  खतरनाक गुंडाची भूमिका साकारली आहे. विक्रम वेधाच्या साऊथ व्हर्जनमध्ये वेधा ही भूमिका अभिनेता विजय सेतूपतीनं साकारली. आता विजय सेतूपतीसोबत काही लोक हृतिकची तुलना करत आहेत. याबाबत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हृतिकनं सांगितलं.


'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात कोण असेल?


'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे या वादग्रस्त कार्यक्रमाची आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाबद्दल मास्टमाईंड उत्कर्ष शिंदे म्हणाला,"नव्या पर्वात ऑलराऊंडर, टास्क मास्टर, मास्टरमाईंड कोण असेल याची मला उत्सुकता आहे".