मुंबई: अभिनेता सलमान खानच्या घरासमोरील शौचालय नियमबाह्य असल्याचं प्रमाणपत्र, खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं आहे.
तसंच सलमान खानच्या घरासमोर उभारण्यात आलेलं शौचालय हटवण्याचे आदेश आज (सोमवार) मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत. हे शौचालय नियमबाह्य रितीनं उभारले असल्याने ते हटवण्यात यावे अशी सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर दिल्या.
शौचालय हटवण्याच्या मुद्द्यावर वहिदा रेहमान, सलमान खानचे वडिल सलिम खान यांनी आज महापौरांची भेट घेतली. महापौर महाडेश्वरांनी वांद्रेतील स्थानिक रहिवाशांचे मुद्दे ऐकुन घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन हे शैाचालय हटवण्याबाबत सूचना दिल्या.
दरम्यान, याआधीही बँडस्टॅण्डवरील शौचालय हटवण्यात यावं अशा आशयाचं पत्र सलीम खान यांनी महापौरांना दिलं होतं. सलीम खान यांच्या पत्राची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एच पश्चिमचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना पत्र लिहून या संदर्भात कार्यवाही करण्यासंबंधी सुचवलं होतं. मात्र मुतारी सुरुही झाली नसताना केवळ दुर्गंधीच्या शक्यतेने रहिवासी त्याला विरोध करत असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं.
वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्डवर पर्यटक तसंच पादचाऱ्यांची गर्दी असते. त्यांच्यासाठी येथे मुतारीची सोय करण्याची आवश्यकता आहे. पाणी, मलनिस्सारण वाहिनी, वीज यांची सोय केली जाणार आहे. तसंच शौचालयाच्या देखभालीसाठी 24 तास कर्मचारी नेमण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं होतं.
हागणदारीमुक्त स्वच्छ मुंबई या योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर असणारा सलमान खान स्वतःच्याच घरासमोर बांधलं जाणारं सार्वजनिक शौचालय हटवण्याच्या प्रयत्नात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सलमान आणि सलीम खान यांच्यासोबत शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनाही या संभाव्य शौचालयाचा त्रास होऊ लागल्यानं आज सलीम खान यांच्यासोबत महापौरांची भेट घेतली होती.
संबंधित बातम्या:
दुर्गंधीच्या शक्यतेने टॉयलेट हटवणार नाही, सलमानची मागणी अमान्य
हागणदारीमुक्तीचा सदिच्छादूत सलमानलाच घरासमोर टॉयलेट नको