Mangal Dhillon Passed Away : हिंदी आणि पंजाबी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मंगल ढिल्लन (Mangal Dhillon) यांचे  आज (11 जून 2023) सकाळी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. पंजाबमधील लुधियाना शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 


अभिनेता यशपाल शर्माने मंगल ढिल्लन यांच्या निधनाच्या बातमीला दिला दुजोरा


एबीपी न्यूजसोबत बोलताना अभिनेता यशपाल शर्माने मंगल ढिल्लन यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला,"दीर्घकाळापासून मंगल ढिल्लन कर्करोगाशी झुंज देत होते आणि लुधियानाच्या कर्करोग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते". मंगल यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींसह चाहते शोक व्यक्त करत आहेत. 



मंगल ढिल्लन यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Mangal Dhillon)


मंगल ढिल्लन यांचा जन्म फरीदकोटच्या पंजाबी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण पंजाबमध्ये पूर्ण केल्यानंतर ते उत्तर प्रदेशात गेले. त्यानंतर पुन्हा ते पंजाबमध्ये आले आणि तेथून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. मंगल ढिल्लन हे अभिनेते असण्यासोबत लेखक आणि सिने-दिग्दर्शकही होते. नाटकांमध्येदेखील त्यांनी काम केलं आहे. दिल्ली आणि चंदीगडची रंगभूमी त्यांनी गाजवली आहे. मालिकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. 
त्यांच्या नकारात्मक भूमिकाही चांगल्याच गाजल्या आहेत. 


मंगल ढिल्लन यांचा सिनेप्रवास जाणून घ्या...


मंगल ढिल्लन यांनी नाटक आणि मालिकांसह अनेक सिनेमांत काम केलं आहे. 'खून भरी मांग', 'जख्मी महिला', 'दयावान', 'भ्रष्टाचार', 'अकेला', 'विश्वात्मा', 'अंबा', 'अकेला', 'जिंदगी एक जुआ', 'दलाल', 'साहिबान' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आणि  स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. 'बुनियाद', 'कथा सागर','जुनून', 'मुजरिम हाजिर', मौलाना आजाद', 'परमवीर चक्र', 'युग' आणि 'नूर जहा' या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत.


मंगल ढिल्लोन यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगल ढिल्लन  1994 मध्ये चित्रकार रितू ढिल्लन यांच्यासोबत लग्नबंधनात अडकले. मंगल ढिल्लोन हे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मातेही होते.त्यामुळे त्यांच्या कामात त्यांना त्यांची पत्नी मदत करत असे. त्यांनी 'एमडी अँड कंपनी' नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. त्याअंतर्गत त्यांनी अनेक पंजाबी सिनेमांची निर्मिती केली आहे. 


संबंधित बातम्या


Rubina Dilaik : 'बिग बॉस 14' विजेती रुबिना दिलैकच्या कारचा अपघात; पतीने दिली हेल्थ अपडेट