Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) दाखल केलेल्या याचिके संबंधित कागदपत्रे गहाळ झाली आहेत. कागदपत्रांअभावी सुनावणी होत नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay  High Court) नाराजी व्यक्त केली आहे. आता पुढील सुनावणी दरम्यान कागदपत्रे सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. 


नेमकं प्रकरण काय?


साल 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी 2 हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी एका नायजेरियन ड्रग पेडलरला अटक केली होती. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातून 2 तरुणांना अटक करण्यात आली. त्या तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरला अटक झाली होती. या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या 'एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक' या कंपनीवर छापा टाकण्यात आला. तेव्हा तिथून 2 हजार कोटी रुपये किंमतीचं 'एफिड्रिन' हे ड्रग्ज सापडलं होतं.


या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणात ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडल्यानं तिलाही याप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं सांगत तिनं हा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ममता कुलकर्णी आणि तिचा पती हे गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पसार झाले असून ते परत कधीही भारतात आलेले नाहीत.






ममता कुलकर्णीने दाखल केलेल्या याचिके संबंधित कागदपत्रे गहाळ झाल्याने सुनावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ती कागदपत्रे पुन्हा तयार करावीत आणि पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर सादर करावीत असे आदेश निबंधक कार्यालयाला दिले आहेत. 


साल 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात साल 2018 मध्ये ही याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पी.के. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली. तेव्हा, न्यायमूर्ती डेरे यांनी यापूर्वी या सुनावणीतून माघार घेतल्याचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत साल 2018 च्या आदेशाची प्रत कोर्टापुढे सादर केली. त्याची दखल घेत या खंडपीठानं या याचिकेवर सुनानणी घेण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले.


ममताने दाखल केलेल्या याचिके संबंधित कागदपत्रांचा शोध सध्या सुरू असल्याचं न्यायालयाच्या निबंधक कार्यालयातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले आहे. 


ममता कुलकर्णी कोण आहे?


ममता कुलकर्णी ही मराठी अभिनेत्री आहे. पण तिने अनेक हिंदी सिनेमांत काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. करण अर्जुन, कभी तुम  कभी हम, गॅंगस्टर, तिरंगा, दिलबर, वक्त हमारा है, भूकंप, सबसे बडा खिलाडी अशा अनेक सिनेमांत ममता झळकल्या आहेत. 



संबंधित बातम्या


Mahesh Manjrekar : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश