Majha Katta : 'एबीपी माझा'च्या महाकट्टा या कार्यक्रमात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) आणि लेखक प्रशांत दळवी (Prashant Dalvi) ही जोडगोळी सहभागी झाली. दरम्यान चंद्रकांत कुलकर्णी यांनी मोठी घोषणा केली. 'एबीपी माझा'च्या 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एबीपी माझाच्या माझा महाकट्टा या कार्यक्रमात चंद्रकांत कुलकर्णी यांनी 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर केलं आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेच्या लेखन, दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांभाळली होती.
चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले,"जिगीषाला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. सध्या संस्थेची सहा नाटकं सुरू आहेत. सातत्याने नाटक सुरू असण्याची गंमत अशी आहे की, माझ्याबाबतीत असं झालं आहे की, पहिलं नाटक बसवल्यानंतर ते सुरू आहे आणि दुसरं आल्यानंतरही ते सुरुच आहे. एकाच वेळी वेग-वेगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही चांगली बाब आहे. पूर्वी फक्त काम पोहोचत होतं. पण आता नव्या माध्यमामुळे आमचे चेहरेदेखील प्रेक्षकांना दिसत आहेत. माझा कट्ट्यासारख्या कार्यक्रमांमुळे आमच्या लोकप्रियतेत आणखी वाढ होते".
नाट्यप्रवासाबद्दल बोलताना प्रशांत दळवी म्हणाले,"नाट्यक्षेत्रात ठरवून आलेलो नाही. महाविद्यालयात असताना एकांकिकेच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. पहिली एकांकिका एका एकांकिका स्पर्धेमध्ये पहिली आली. 'गल्ली', 'स्त्री' अशा एकांकिका त्यावेळी लिहिल्या. पुढे प्रायोगिक नाटकं करू लागलो.
मला वाटतं, प्रत्येक काळाची एक रंगसंवेदना असते आणि ती रंगसंवेदना तुम्ही जुनं नाटक करत आहात की नवी नाटकं करत आहात हे ठरवत असते. त्यावेळी प्रेक्षक घडवण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत असे. हौशी नाट्यसंस्थेतला 'हौशी' हा शब्द मला कधीच आवडत नाही. कारण आम्ही प्रायोगिक नाटक करत असलो तरी त्यात एक शिस्त होती".
चंद्रकांत कुलकर्णांनी नाटकाचं वेड कसं लागलं?
नाटकाच्या वेडाबद्दल बोलताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले,"शाळेत असताना वादविवाद स्पर्धेत भाग घेत असे. या क्षेत्रात येऊ नये असं वातावरण आसपास होतं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. औरंगाबादमध्ये असताना अनेक प्रायोगिक नाटकं केली. पुढे वयाच्या 24 व्या वर्षी प्रशांत दळवीच्या माध्यमातून मी मुंबई गाठली. मी नाटकात काम करत असे. पण जिगीषामुळे मला अनेक चांगल्या संधी मिळाल्या".
चंद्रकांत कुलकर्णी पुढे म्हणाले,"जिगीषा स्थापन करण्याची भावना अशी होती की, औरंगाबादमधील नाटकांचं वातावरण खूप चांगलं होतं. जिगीषामध्ये रक्ताचं कोणी नाही. पण इथे काम करणाऱ्या मंडळीचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त आहे. नदीत पोहोलो होतो पण समुद्रात पोहोण्यासाठी मुंबई गाठली. जिगीषाची गंमत म्हणजे या संस्थेतील सर्व मंडळी उच्च शिक्षित आहेत.छोटा पडद्यापेक्षा नाटक आणि सिनेमांत आम्ही जास्त रमलो".
चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले,"लोकशाही आणि नागरिक शास्त्राचे सर्व नियम नाटकाला लागू होतात. लेखकाचं, दिग्दर्शकाचं नाव वाचून प्रेक्षक नाटकाला येतात. प्रेक्षकांच्या विश्वासामुळे एक समाधान मिळतं. आजवर प्रयोगशील राहण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत".
संबंधित बातम्या