Bollywood Offer to Viral Girl Monaliasa : प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातून व्हायरल झालेल्या मोनालिसाचं नशीब फळफळलं आहे. आता मोनालिसाला बॉलिवूडची ऑफर मिळाली आहे. महाकुंभ मेळ्यात साधू-संत आणि भाविकांच्या गर्दी गळ्यातील माळा विकणारी सुंदर तरुणी चर्चेत आली. सावळा रंग आणि सोनेरी डोळ्यांची ही अत्यंत साधी मुलगी, पण तिच्या सुंदरतेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. जनसामान्यांच्या गर्दीत काळजाचा ठाव घेणारी ही अप्सरा आता लवकरच फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. व्हायरल गर्ल मोनालिसा लवकरच बॉलिवूड चित्रपटात पदार्पण करणार आहे.
व्हायरल गर्ल मोनालिसाला बॉलिवूडची ऑफर
व्हायरल गर्ल मोनालिसा आता लवकरच बॉलिवूड जगतात प्रवेश करणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या आगामी 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटासाठी मोनालिसाला ऑफर दिली आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' सारख्यां चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात मोठे कलाकारही झळकणार आहेत.
मोनालिसाची चित्रपटांत काम करण्याची इच्छा पूर्ण
प्रयागराजमध्ये वडिलांना माळा विकून दोन पैसे कमावण्यासाठी मदत करण्याच्या इच्छेने पोहोचलेली मोनालिसा भोसले रातोरात प्रसिद्ध झाली. आता याच प्रसिद्धीमुळे तिचं बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसा भोसलेला पुढील चित्रपटासाठी साइन केलं आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील महिन्यात सुरू होईल आणि सुमारे 5 महिन्यांत पूर्ण होईल. दरम्यान, हा चित्रपट या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात मोनालिसासोबत अनेक मोठे चित्रपट कलाकारही दिसणार आहेत.
मोनालिसासोबतचे शुटिंग फेब्रुवारी महिन्यामध्ये
चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाकुंभात व्हायरल झाल्यानंतर, मोनालिसाला चित्रपट ऑफर करणारा मी पहिला होतो, आम्ही आगामी चित्रपटासाठी तिला साईन केलं आहे. हा चित्रपट खूपच कमी बजेटचा आहे. या चित्रपटाचं बजेट सुमारे 20 कोटी रुपये असेल. मोनालिसासोबतचे चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आङे. हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. लोकल 18 शी खास बातचीत करताना त्यांनी याबद्दल माहिती दिली.
अभिनेता राजकुमार रावचा भाऊ अमित राव मुख्य भूमिकेत
त्यांनी पुढे सांगितलं की, मणिपूरच्या डायरीवर आधारित हा चित्रपट मणिपूर, दिल्ली तसेच लंडनमध्ये चित्रित केला जाईल. 8 फेब्रुवारीपासून लंडनमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरू होईल. या चित्रपटात मोनालिसासोबत प्रसिद्ध चित्रपट अभिनेता राजकुमार राव याचा मोठा भाऊ अमित राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, दिग्दर्शक आणि अभिनेता महेंद्र लोधी सारख्या मोठ्या कलाकारांसह मणिपूरमधील बहुतेक स्थानिक कलाकार असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :