Madhubala Biopic : बॉलीवूड चित्रपटांच्या गोल्डन पिरेडविषयी जेव्हा भाष्य केलं जातं, त्यामध्ये अभिनेत्री मधुबालाचं (Madhubala) नाव आवर्जुन घेतलं जातं. मधुबाला यांच्या सौंदर्याचे जितके चाहते आज आहेत, तितकेच त्यांच्या अभिनयाचे देखील चाहते आहेत. आजही मधुबालाचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. त्यामुळे या सर्व चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी लवकरच मधुबालाच्या चित्रपटाची पर्वणी होणार आहे. कारण 'मधुबाला' यांचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. 


सध्या अनेक बायोपिक मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. यामधील अनेक चित्रपट हे सध्या बॉक्स ऑफिसवरही यश मिळवतायत. हिंदीसह मराठीतही बायोपिकची मालिका सुरु आहे. नुकतच मराठी सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. त्यातच नुकतच कंगना राणौत मुख्य भूमिकेत असलेल्या ‘एमर्जन्सि’ या चित्रपटाची देखील जोरदार चर्चा होती. आता मधुबालाच्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे. 


सोशल मीडियावर चित्रपटाची अधिकृत घोषणा


सोनी पिक्चर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलीये. मागील काही काळामध्ये मधुबाला यांचा बायोपिक येणार असल्याचं म्हटलं जात होतं. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा या बायोपिक करणार असून अभिनेत्री क्रिती सॅनॉन यामध्ये मधुबालाच्या भूमिका साकारणार असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण मधुबाला यांच्या बहिण मधुर ब्रीज भूषण यांनी या सगळ्या चर्चा खोडून काढल्या होत्या. तसेच हा बायोपिक इतर कोणीही करण्याचं धाडसंही करु नये असं त्यांनी एका मुलखातीमध्ये म्हटलं होतं. पण नुकतच आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जसमीत के रीन यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. तसेच मधुबाला यांची बहीण मधुर ब्रीज भूषण या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनने या चित्रपटाची घोषणा केलीये. 


'या' अभिनेत्रीला मधुबाला यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक


दरम्यान सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत कोणत्या अभिनेत्रीला मधुबालाच्या भूमिकेत पाहायला आवडेल हे सांगितलं आहे. यामध्ये अनेकांनी आलियाला मधुबाला यांच्या भूमिकेत पाहायला आवडेल असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. त्यामुळे रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना कोणती अभिनेत्री मधुबालाच्या भूमिकेत पाहायला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Siddharth Chandekar : 'त्यांना आईसाठी किती काय करावंस वाटतं हे जास्त महत्त्वाचं होतं....', आईसाठी जोडीदार निवडताना सिद्धार्थने 'या' गोष्टींचा केला विचार