Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. नुकतच सिद्धार्थ श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्याच्या कामामुळे सिद्धार्थ कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. पण काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे तो बराच चर्चेत आला. अनेकांनी त्याच्या या कृतीचं भरभरुन कौतुक केलं तर काहींनी थेट नापसंती दर्शवली. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर (Seema Chandekar) यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. वयाच्या 50 दुसरं लग्न करणं आणि मुलाने आईला या सगळ्यात खंबीर साथ देणं हा संपूर्ण प्रवास सिद्धार्थ सांगितला आहे.
नुकतच सिद्धार्थने लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आईच्या दुसऱ्या लग्नाविषीय भाष्य केलं आहे. दुसरं लग्न करण्यासाठी सिद्धार्थने आईला कसं तयार केलं याविषयी देखील त्याने यावेळी सांगितलं. यासगळ्यामध्ये मितालीने त्याला कशी साथ दिली याविषयी देखील सिद्धार्थ व्यक्त झाला आहे. सुरुवातीला हे सगळं करताना मी फार घाबरलो होतो आणि आईने मला थेट नकार दिला होता, असं सिद्धार्थने यावेळी म्हटलं.
आईने मला सरळ सांगितलं हे शक्य नाही - सिद्धार्थ चांदेकर
सुरुवातीला जेव्हा मला विचार आला तेव्हा मी पूर्ण घाबरलो होतो. कारण मी तिचा मुलगा जरी असलो तरी तिला रात्री जो संवाद साधायचा आहे, त्यासाठी ती काय करत असेल हा विचार माझ्या मनात यायचा.मी जेव्हा तिला हे सांगितलं तेव्हा तिने मला थेट नाही सांगितलं की हे शक्य नाही होणार. अर्थातच लोक काय विचार करतील हा विचार ती करत होती. तेव्हा मी तिला सांगितलं की, लोकं आपलं आयुष्य नाही जगणार आहेत. ते त्यांचं आयुष्य जगतायत. आपण इतक्या सगळ्यातून सावरलो पण आज आपलं काहीतरी उभं केलंय. काही झालं तर पुन्हा उभं करु. तेव्हा तिला वाटलं की हे करावं, असं सिद्धार्थने सांगितलं.
मितालीने खूप प्रॅक्टिकल विचार केला - सिद्धार्थ चांदेकर
मितालीने या सगळ्यात सिद्धार्थला कशी साथ दिली यावर बोलताना सिद्धार्थने म्हटलं की, मिताली ही फार प्रॅक्टिकल मुलगी आहे. त्यामुळे मी अनेकदा भावनिक होऊन विचार करतो. पण ती मला नेमही कोणत्याही गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करायला लावते. तिने मला म्हटलं की, ठिक आहे तू हे सगळं करतोय पण तिला पुन्हा एकदा जर तिला यामध्ये त्रास झाला तर काय करायचं. तेव्हा मला वाटलं की हो हा विचार करायला हवा, असं सिद्धार्थने म्हटलं.
माझ्यासाठी ही गोष्ट जास्त महत्त्वाची होती - सिद्धार्थ चांदेकर
जेव्हा आमच्या भेटी झाल्या तेव्हा मला एक दोन भेटीतच कळलं की, ही व्यक्ती फार जेन्युइन आहे. ते आईसाठी किती काय काय करतील त्यापेक्षा त्यांना आईसाठी किती काय काय करावसं वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. त्यांच्या नजरेत मला ते कळालं. असं नाही झालं की ते आईला भेटले आणि त्यानंतर लगेचच लग्न झालं. साधारणपणे आमच्या 15 ते 20 भेटी झाल्या. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी या सगळ्यावर चर्चा झाली. त्या सगळ्यावर चर्चा झाल्यानंतर एकदम प्रॅक्टिकली आणि भावनिक असा एकत्र होऊन हा निर्णय घेतल्याचं सिद्धार्थने सांगितलं.