London Misal : 'लंडन मिसळ' (London Misal) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. फुल टू धमाल असणाऱ्या भरत जाधव (Bharat Jadhav) आणि गौरव मोरे (Gaurav More) यांच्या सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.


'लंडन मिसळ' कधी होणार रिलीज? (London Misal Release Date)


जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा सिनेमा येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव अत्यंत हटके अशा प्रमुख भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.  आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे.  रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा सिनेमा प्रेरित आहे, हे या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य.


लंडन मिसळ चित्रपटातल्या चटपटीत सीन्सनी  आणि कलाकारांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी भरलेला ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रितिका आणि ऋतुजाचे चित्रपटातील लूक्स कथेतील उत्सुकता वाढवतायत तर आपल्या अभिनयातून भरत जाधव पुन्हा एकदा विनोदाची चौफेर फलंदाजी करताना दिसतायत. गौरव मोरेनेही नेहमीप्रमाणे हास्याचे षटकार आपल्या सीन्समधून मारलेयत. त्यामुळे अर्थातच चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता वाढलीय. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशिय चिटणीस श्री.श्रीकांत भारतीय हे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.


वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी 'लंडन मिसळ' सिनेमाला संगीत दिलं आहे. तर 'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं 'लंडन मिसळ' सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे.  तसेच, सिनेमाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि  समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.


प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी


'लंडन मिसळ' या सिनेमात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल.


'लंडन मिसळ'चं कथानक काय आहे? (London Misal Story)


आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे 'लंडन मिसळ'. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


London Misal : मनोरंजनाचा इंग्लिश तडका! 'लंडन मिसळ' चित्रपटाचं पोस्टर रिलीज