मुंबई : टिंग्या, देख इंडियन सर्कस या सिनेमाचा दिग्दर्शक मंगेश हाडवळे या लॉकडाऊनमध्ये अनेकांसाठी देव बनला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. हे पुढे येणारं संकट वेळीच ओळखून मंगेशने 20 मार्चपासूनच एक नवी चळवळ उभी केली आहे. विशेष म्हणजे या त्याच्या चळवळीला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मंडळींचीही मोलाची साथ लाभली आहे.
मंगेश 20 तारखेपासून हातावर पोट असलेल्या लोकांसाठी अन्नदानाचं काम करतो आहे. याबद्दल माझाशी बोलताना तो म्हणाला, 'मी मुळात जुन्नरचा. मुंबईत लॉकडाऊन होतंय म्हटल्यावर मलाही वाटलं तिकडे जावं. पण तिथे जाण्यासाठी आपण आपल्या मुंबईत थांबून काही करता येतं का हे मी पाहात होतो. या लॉकडाऊनच्या काळात ज्या लोकांना अन्नाची भ्रांत आहे अशांसाठी काम करण्याचं मी आणि माझ्या काही मित्रांनी ठरवलं." या काळात ज्यांची नोकरी थांबली आणि अन्नाचा प्रश्न उभा राहिला अशांसाठी मंगेश स्वत: आपल्या गाडीतून धान्य, अन्न पोहोचवत होता. 50 कुटुंबियांची जबाबदारी घेऊन त्यांच्यापर्यंत हे सामान पोहोचवणं अशी त्याची सुरुवात होती. त्याचे वेळोवेळचे अपडेट तो फेसबुकवरही देत होता. त्याचे काही फोटोही त्याने शेअर केले होते.
प्रत्येक वस्तू पॅक करुन गाडी भरुन तो ठिकठिकाणच्या कुटुंबांना देत होता. आता त्याचा व्याप वाढला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, "गेल्या महिन्याभरापासून आम्ही जवळपास सहा हजार कुटुंबांना ही मदत पोहोचवली आहे. यात मला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माझ्या काही मित्रांचीही मदत होते आहे. आता केवळ मुंबईतूनच नव्हे, तर तुर्भे इथूनही मदतीची मागणी आली. तिथे पोहोचणं आता शक्य नाही. मग इंटरनेटवरुनच मी तिथल्या दुकानांची माहिती घेतली. त्यांच्याशी बोलून प्रत्येक घरात आवश्यक सामान जाईल याची लिस्ट त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्याचं जे बिल होईल ते मी ऑनलाईन भागवलं."
त्याच्या या उपक्रमाचं कौतुक बॉलिवूड कलाकारांनीही केलं आहे. फेसबुकवर तर त्याच्या या कामाबद्दल त्याचं खूप कौतुक होतं आहे. पण बॉलिवूडचे अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीही ऑडिओद्वारे त्याच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. अर्थात हे काम अद्याप थांबलेलं नाही.
मंगेशच्या कामाबद्दल बोलताना त्याचा भाऊ मनोज हाडवळे म्हणाले, "मंगेशने पाहिल्या टप्प्यात 40 कुटुंबांना रेशन दिले. काही मित्रांसोबत चर्चा केली, मग त्यात, महावीर जैन, पिंकेश नहार यांच्यासारखी मित्र मंडळी पुढे आली. गरजूंची संख्या वाढतच चाललेली तशीच आर्थिक मदत करणाऱ्यांचेही हात समोर येऊ लागले. आता काही संस्था पण जोडल्या गेल्या, कोरोनाचे लॉकडाऊन, त्यामुळे बाहेर पडता येत नव्हते, मग गरजू लोकांपर्यंत सामान पोहोचणार कसे? त्यासाठी मंगेशने खास युक्ती शोधली, मंगेशशी या निमित्ताने त्याच्यासोबत जोडल्या गेलेल्या अनेक संस्था आणि स्वयंसेवक मित्रमंडळींनी कार्यक्षेत्र म्हणून संपूर्ण मुंबई शहर, ठाणे, ग्रामीण ठाणे, वाडा, सातारा या भागात काम सुरु केलं. आतापर्यंत 6 हजार 300 कुटुंबांना ही मदत झालेली आहे.
या कुटुंबामध्ये वितरित झालेला जिन्नस असा....
31500 किलो - गव्हाचे पीठ,
25, 200 किलो - तांदूळ
18, 900 किलो - दाळ
6, 300 किलो - तेल
10,800 किलो - साखर
800 किलो - चहा पावडर
1,200 किलो - लाल तिखट
800 किलो - हळद
700 किलो - गरम मसाला
22, 000 - साबण