Lalita Shivaji babar: भारताच्या राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच, धावपटू ललिता शिवाजी बाबरने आजपर्यंत अनेक पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. तिची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा 'ललिता शिवाजी बाबर' (Lalita Shivaji babar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत.


ललिता शिवाजी बाबरची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) साकारणार असून तिचा हा पहिलाच बायोपिक आहे. काल (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले. पुढील वर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


'ललिता बाबर'ची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, 'एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून अधिक आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी भारतातील ती पहिल्या धावपटू आहे. तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबरच्या संपर्कात आहे. तिची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय.'


अमृता खानविलकरनं सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केला आहे. अमृतानं हे पोस्टर शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे.






प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर नव्या चित्रपटाबाबत बोलताना म्हणाले की, "साताऱ्यातील एका लहान गावात, शेतकरी कुटुंबात ललिता बाबरचा जन्म झाला. ती रोज शाळेत धावत जायची आणि तिथूनच तिनं धावण्याचा सराव सुरू केला. तिच्या या मार्गात अनेक अडथळे आले, मात्र तिनं जिद्द सोडली नाही. आज संपूर्ण जगात ती 'माणदेशी एक्सप्रेस' या नावाने ओळखली जाते. तिचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकालाच नवीन ऊर्जा देणारा आहे. म्हणूनच तिचा हा स्फूर्तिदायी प्रवास जगभरात पोहोचावा, याकरता एंडेमॉल शाईन इंडिया यांच्या साथीने आम्ही या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. ललिताची आजवरची कारकीर्द पाहता 'ललिता शिवाजी बाबर'चे पोस्टर प्रदर्शित करण्यासाठी प्रजासत्ताक दिनासारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. आज या चित्रपटाचे पोस्टर झळकवून आम्ही तिच्या कारकिर्दीला सलाम करत आहोत.’’


महत्वाच्या इतर बातम्या: 


Entertainment News Live Updates 27 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!