Lalita Pawar : सिने-अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar) यांचा जन्म नाशिकजवळील (Nashik) येवला (Yewale) येथे झाला. 18 एप्रिल 1916 रोजी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी ललिता पवार यांचा जन्म झाला. वयाच्या 12 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ललिता पवार यांनी सात दशके प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 70 वर्षांत त्यांनी 700 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे.
येवल्याच्या ललिता पवार यांचा सिनेप्रवास जाणून घ्या...
ललिता पवार यांनी बालकलाकार म्हणून मूकपटात काम करायला सुरुवात केली. 1928 साली 'आर्यमहिला' या मूकपटाच्या माध्यमातून ललिता पवार यांनी काम करण्यास सुरुवात केली. गनिमी कावा, ठकसेन राजपुत्र, समशेर बहादूर, चतुर सुंदरी, पृथ्वीराज संयोगिता, दिलेर जिगर या मुकपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांना बोलपटासाठी विचारणा झाली.
ललिता पवार यांचा हिम्मते मर्दा हा सिनेमा खूपच गाजला. पुढे त्यांनी 'दुनिया क्या है' या सिनेमाची निर्मितीदेखील केली. अमृत, गोरा कुंभार, जय मल्हार, रामशास्त्री, अमर भूपाळी, मानाचं पान, चोरीचा मामला असे त्यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. ललिता पवार यांनी नायिका म्हणून काम करण्यासोबत खलनायिका म्हणूनदेखील काम केलं आहे.
ललिता पवार नायिकेच्या खलनायिका कशा झाल्या?
ललिता पवार या एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. मनोरंजनसृष्टीत नायिका म्हणून त्यांचा प्रवास सुरू होता. 'जंग ए आझादी' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ललिता पवार यांना थोबाडीत मारण्याचा एक सीन होता. त्यावेळी त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. तसेच त्यांच्या शरीराच्या डाव्या भागाचा लकवा गेला. त्यानंतर जवळपास तीन वर्ष उपचार सुरू होते. पण त्यांचा डावा डोळा मात्र त्यांना गमवावा लागला. त्या घटनेनंतर त्यांना नायिकेच्या भूमिकेसाठी कधीही विचारणा झाली आहे. पण खलनायिका म्हणून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यांनी साकारलेल्या खाष्ट सासूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
ललिता पवार या अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील होत्या. 'हिम्मत ए मर्दां' या सिनेमातील त्यांनी गायलेलं 'नील आभा में प्यारा गुलाब रहे, मेरे दिल में प्यारा गुलाब रहे' हे गाणं चांगलच गाजलं. रामानंद सागर यांच्या 'रामायण; या पौराणिक मालिकेत त्यांनी मंथराची भूमिका सारारली होती.
ललिता पवार यांना जबड्याचा कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. कॅन्सरदरम्यान त्यांचे वजन कमी झाले. तसेच त्यांना स्मृतीभ्रंशही झाला होता. अखेर 24 फेब्रुवारी 1998 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संबंधित बातम्या